ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी मिळून महामुंबई टीम स्थापन केली आहे. या समितीने पत्रकार परिषद घेत मराठा जोडो अभियानाची घोषणा केली.
६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यादिवशी रायगडावर विविध उपक्रम राबवण्यात येतील, अशी माहिती समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिली.शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी महामुंबई टीम मुंबई विभागातील विद्यार्थ्यांसाठी काम करेल. महामुंबईतील महाविद्यालयांत मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, त्यांच्या शुल्काबाबत ही टीम काम करणार आहे. ९ ऑगस्टच्या मोर्चामध्ये महामुंबई टीम नियोजन करेल. खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा असेल.
९ ऑगस्ट हा एकच सकल मराठा समाजाचा एकमेव मोर्चा असेल. फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मराठा समाज त्याला बळी पडणार नाही. इतर मोर्चांना संघटना विरोध करणार नसून केवळ शुभेच्छा दिल्या जातील.
शिक्षण मंत्र्यांना ८ दिवसांचा अल्टीमेटम...
शिक्षण मंत्री विनोद तावडे स्वत: मराठा समाजाचे असून मराठा विद्यार्थ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची जबाबदारी त्यांची आहे. ४८ टक्के जागांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना परप्रांतियांशीही स्पर्धा करावी लागते. त्यामुळे ८ दिवसांत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ठोस घोषणा केली नाही, तर पालक व विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशारा पवार यांनी दिला आहे.