मागच्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या कोकण रेल्वेच्याभारतीय रेल्वेमधील विलिनीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कोकण रेल्वेच्याभारतीय रेल्वेमधील विलिनीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेमध्ये दिली. कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण होणार असलं तरी या मार्गाला देण्यात आलेलं कोकण रेल्वे हे नाव कायम राहणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोकण रेल्वेबाबत आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा करण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना ही महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या चार राज्यांच्या सहकार्याने झाली होती. मात्र सद्यस्थितीत आर्थिक चणचण आणि निधीअभावी भविष्यकालीन प्रकल्प मार्गी लावताना कोकण रेल्वेसमोर अडचणी येत आहेत. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने कोकण रेल्वे महामंडळाचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले. कोकण रेल्वेच्या भारतील रेल्वेमधील विलिनीकरणामुळे कोकण रेल्वेच्या दुपदरीकणासह अनेक महत्त्वपूर्ण कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळून जाणारा कोकण रेल्वेचा मार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांमधून जातो. महाराष्ट्रातील रोहा ते कर्नाटकमधील ठोकूरपर्यंतचा हा मार्ग ७४१ किलोमीटर लांबीचा आहे.