बेळगाव - सीमाभागात मराठी आणि कानडी भाषिकांमधील वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषकांविरोधात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली असून, मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे विधान केले आहे. मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन आता 60 वर्षे पूर्ण होत आली असली तरी कन्नड भाषिक कर्नाटकमध्ये समाविष्ट झालेले बेळगाव, निपाणी, कारवार हे मराठी भाषिक प्रदेश अद्याप महाराष्ट्रात सामील होऊ शकलेले नाही. त्यामुळे या सीमाभागात मराठी भाषिक आणि कानडी भाषिकांमध्ये वारंवार तणाव निर्माण होत असतो. दरम्यान, आज कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी मराठी भाषक आणि कर्नाटकमधील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी झगडणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात गरळ ओकली आहे. ''गेल्या 64 वर्षांपासून बेळगावच्या जनतेला वेठीस धरणाऱ्या आणि बेळगावातील कन्नड भाषिकांच्या स्वाभिमानास आव्हान देणाऱ्या, कर्नाटकमधील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना खासदांरानी कधी जाब विचारला आहे का?, खरंतर मराठी भाषिक एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सीमेवर उभे करून गोळ्याच झाडल्या पाहिजेत. एकदाच काय ते होऊन जाऊ दे. तसे झाल्यास आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल, असे विधान भीमाशंकर पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घाला, कनसेचे प्रमुख बरळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 18:59 IST