बांगलादेशी घुसखोरांवरून देशभरात वातावरण तापू लागले आहे. ठिकठिकाणी बांगलादेशी घुसखोर सापडू लागले आहेत. परंतू, प्रशासनाने या घुसखोरांना सर्व प्रकारची प्रमाणपत्रे पुरविल्याने आजही अनेक बांगलादेशी नागरिक बिनदिक्कत राहत आहेत. २०२४ मध्ये किती बांगलादेशींना जन्माचे दाखले देण्यात आले याची आकडेवारी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मांडली आहे. यात त्यांनी पुणे शहराचे कौतुक केले आहे.
राज्यात २०२४ मध्ये ६० हजार लोकांना जन्माचे बोगस दाखले देण्यात आले आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मालेगाव 4500, अमरावती 14,500 एवढे प्रचंड संख्येने दाखले देण्यात आले आहेत. मुंबईत ५८ दाखले देण्यात आले असून पुणे शहरात कोणाला ही बोगस दाखले देण्यात आलेले नाहीत. याचे मी कौतुक करत आहे, असे सोमय्या म्हणाले.
2023 नोव्हेंबरमध्ये जन्म मृत्यूच्या दाखल्यांचा अधिकार तहसीलदारांना देण्यात आला म्हणून हा गोंधळ झाला आहे. पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहेत. त्याची माहिती मी मागविली आहे. ही माहिती मिळताच मी लगेचच एटीएसला ती देणार आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले म्हणून हे बाहेर आले, असे सोमय्या म्हणाले.
वाल्मीक कराड विषय वेगळा आहे. यात कोणालाही सोडले जाणार नाही. कालपर्यंत सुळे आणि ते सोबत होते. वाल्मीक कराड नोटीस आली तेव्हा सरकार त्यांचेच होते. मी कोणाविषयी तक्रार मागे घेतली नाही, असेही कराड यांच्यावरील ईडी नोटीस कारवाईवर सोमय्या यांनी स्पष्ट केले.