मुंबई : गोरेगाव आणि गोवंडी परिसरातून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका मुलीचा समावेश आहे. दोघांचाही शोध पोलीस घेत आहेत. गोरेगाव पश्चिमेकडील परिसरात १३ वर्षांचा आर्यन (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहातो. गुरुवारी रात्रीच्या सुमारास तो घराबाहेर खेळत होता. बराच वेळ होऊनदेखील तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, त्याचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. अखेर कुटुंबीयांनी गोरेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेपाठोपाठ कामानिमित्त घराबाहेर पडलेली १७ वर्षांची मुलगी घरी न परतल्याची घटना चेंबूरमध्ये घडली. मित्र-मैत्रिणींकडेही तिचा शोध घेतला. मात्र, कुठेच तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून गोवंडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला. या दोन्ही घटनांमुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (प्रतिनिधी)
गोरेगाव आणि गोवंडीतून अल्पवयीन मुलांचे अपहरण
By admin | Updated: April 8, 2017 03:02 IST