मुंबई : राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर एका लाचप्रकरणी विरोधकांनी शरसंधान साधले असतानाच त्यांचे जावई प्रांजल खेलवलकर यांची सोनाटा लिमोझिन ही आलिशान कार वादात सापडली आहे. या कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप करत ती कार जप्त करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.दमानिया यांनी ट्विटरद्वारे खडसेंच्या जावयाच्या लिमोझिन कारचा मुद्दा उपस्थित केला. खडसे यांचे जावई प्रांजल खेलवलकर यांची एमएच १९ एक्यू ७८०० ही सोनाटा लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा दमानिया यांनी केला. जळगाव आरटीओमध्ये या गाडीची नोंदणी झाली असून, सदर गाडीला पासिंग मिळाले आहे. मात्र, या आलिशान गाडीची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. हलक्या वाहनांच्या (एलएमव्ही) श्रेणीत या कारची नोंदणी करण्यात आली. शिवाय, अॅम्बेसिडर लिमोझिन कारव्यतिरिक्त अन्य लिमोझिन कारना देशात परवानगी नसल्याचा दावाही दमानिया यांनी केला. दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून लिमोझिन कार अवैध असल्याचा आरोप केल्यानंतर लिमोझिन कारला भारतात परवानगी असल्याची बाब काही जणांनी निदर्शनास आणून दिली. त्यासाठी आपली कार ज्या कंपनीची आहे, त्या कंपनीकडून कारमधील बदलांसाठी परवानगी घ्यावी लागते. मूळ कंपनीने दिलेल्या परवानगीनुसार गाडीत बदल केल्यावर संबंधित सरकारी यंत्रणांकडून त्याला मान्यता घ्यावी लागते. (प्रतिनिधी)>सोनाटा कार हरियाणातून ट्रान्स्फर झाली आहे. तिची जळगाव आरटीओ कार्यालयात नोंद असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विकास बऱ्हाटे यांनी ‘लोकमत’ला दिली. दमानिया यांची तक्रार आली नसल्याचेही बऱ्हाटे यांनी सांगितले. खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांची वादग्रस्त ठरलेली ती कार (एम.एच. १९ ए.क्यू. ७८००) दिसताक्षणी ताब्यात घेण्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी भरारी पथकाला दिले आहेत. कारवर नियमानुसार फक्त २५० रुपये दंडाची कारवाई होऊ शकते, असे वारे यांनी सांगितले. ही सोनाटा कार लिमोझिनच्या आकाराची बनविली आहे, त्यामुळे प्रत्यक्ष पाहिल्यावरच नियमबाह्य काय आहे? हे सांगता येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
खडसेंच्या जावयाची कार वादात!
By admin | Updated: May 18, 2016 05:00 IST