Kashmir Pahalgam Terror Attack Live Updates, Eknath Shinde Reaction on Pragati Jagdale: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी करण्यात आला. आज दुपारच्या सुमारास काही पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला. विविध सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी आहेत. याबाबत सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. याच दरम्यान, महाराष्ट्राते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली. मराठी पर्यटक प्रगती जगदाळे हिच्या वडिलांना आणि काकांना धर्म आणि नाव विचारून डोळ्यादेखत गोळ्या घालण्यात आल्या, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी बिळात लपून बसले होते. त्यांचा निषेध करावा तितका थोडा आहे. या पाकड्यांना आम्ही सोडणार नाही. हा भारत देश आहे, त्यामुळे त्यांना 'करारा जवाब' मिळेल. भारताचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पाकड्यांना सोडणार नाहीत. ज्या निरपराध लोकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
"महाराष्ट्रातील पर्यटकांचा या घटनेत समावेश आहे. मी प्रगती जगदाळे या मुलीशी बोललो. तिने सांगितले की तिच्या वडिलांना आणि काकांना नाव विचारून गोळ्या घालण्यात आल्या. अशाप्रकारचा भ्याड हल्ला करण्यात आलाय. ते सर्व पर्यटक घाबरलेल्या अवस्थेत होते. मी त्यांना धीर दिला आणि सांगितले की गृहमंत्री स्वत: तिथे दाखल होत आहेत. मी स्वत: काश्मीरचे नायब राज्यपाल आणि इतर संबंधितांशी बोललो आहे. तिथल्या सर्व लोकांना अपेक्षित मदत मिळेल. लवकरच या पर्यटकांना राज्यात आणण्याची व्यवस्था केली जाईल. एक विशेष अधिकारी नेमला गेलेला आहे, संपर्कासाठी नंबर जारी केला आहे. प्रगती जगदाळे या मुलीशी आम्ही संपर्कात आहोत," असे एकनाथ शिंदे यांनी सांगितला.
"सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. धर्म आणि नाव विचारून केलेला हा हल्ला आहे. हा भारत देशावर केलेला हल्ला आहे. म्हणूनच आता अँक्शनला रिअँक्शन नक्कीच मिळेल. पाकडे बिळात लपले होते, ते बाहेर आलेत, त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री नक्की करतील," असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.