- महेश चेमटेमुंबई : एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) शिवशाहीसाठी कर्नाटकची मदत घेतल्याचे दिसून येत आहे. महामंडळाची ‘ड्रीम एसटी’ अशी ओळख असलेल्या ‘शिवशाही’च्या तब्बल २३० बसचे कंत्राट कर्नाटक येथील खासगी मोटर्स प्रा. लि. कंपनीला देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत ४६० शिवशाही एसटी ताफ्यात दाखल होतील. यासाठी १७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.एसटी वर्धापन दिनानिमित्त परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दोन शिवशाही बसचे लोकार्पण केले. या वेळी कर्नाटक परिसरात महाराष्ट्र-कर्नाटक वाद उफाळून आला होता. त्या वेळी मंत्री रावते यांनी महामंडळाच्या सर्व एसटीवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्याचे आदेश दिले. त्यानुसार एसटी कर्नाटक येथे रवाना झाली होती.हा वाद सुरू असतानाच आता महामंडळाने कर्नाटक आणि मुंबई येथे शिवशाही बस तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यासाठी देशातील प्रतिष्ठित कंपनीकडून चेसिस घेण्यात येणार आहे. कर्नाटक येथील खासगी मोटर्स प्रा.लि. आणि मुंबई येथील खासगी गॅरेजेस प्रा. लि. कंपनीला बॉडी बांधण्याचे कंत्राट दिले आहे. कर्नाटक आणि मुंबई येथील कंपन्यांना प्रत्येकी २३० शिवशाही बस तयार करण्याचे काम देण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यांतर्गत ४६० शिवशाही एसटी ताफ्यात दाखल होणार आहेत. यात बीएस मानांकन-३ च्या ५२ बस आणि बीएस मानांकन-४ च्या ४०८ बस असतील. यासाठी १७५ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.देखभाल, दुरुस्ती खासगी कंपनीतर्फेपहिल्या टप्प्यातील107बस एसटीताफ्यात दाखल झाल्या आहेत.सध्या धावत असलेल्या ‘शिवशाही’मध्ये देखभाल आणि दुरुस्तीच्या तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत. या तक्रारी दूर करण्यासाठी महामंडळाने संबंधित खासगी कंपनीला देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी दिली आहे.
महाराष्ट्रातील ‘शिवशाही’ला कर्नाटकचे छप्पर, खासगी कंपनीला कंत्राट : २३० बस तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 05:09 IST