पुणे : पुरोगामी विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची हत्या आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंंद पानसरे यांच्या हत्यांच्या घटनांमध्ये काहीसे साधर्म्य आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी कलबुर्गी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी हुबळी-धारवाडचे पोलीस पथक पुण्यात दाखल झाले. या पथकाने डॉ. दाभोलकर यांंची हत्या झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी दिली.डॉ. दाभोलकर व पानसरे यांची हत्याही सकाळच्यावेळीच गोळ््या घालून करण्यात आल्या होत्या. तसेच हे तिघेही पुरोगामी विचारांचे होते. तिन्ही हत्यांमध्ये साधर्म्य असल्याने यामागे एकच शक्ती असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येशी कलबुर्गी यांच्या हत्येचा काही संबंध आहे का, याचा तपासही कर्नाटक पोलीस करीत आहेत.तपासासाठी कर्नाटक सरकारने पोलिसांची चार पथके स्थापन केली आहेत. त्यातील धारवाड पोलिसांचे पथक बुधवारी सकाळी पुण्यात दाखल झाले. या पथकाने सुरूवातीला डॉ. दाभोलकर यांची हत्या झालेल्या ठिकाणाला भेट दिली. त्याचा सुरवातीला तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तपासलेले सराईत गुन्हेगार तसेच कारागृहातील गुन्हेगारांबद्दलची माहितीही या पथकाने घेतली.
तपासासाठी कर्नाटक पोलीस पुण्यात
By admin | Updated: September 3, 2015 01:23 IST