शिवडी-न्हावाशेवा सेतूसाठी मुख्यमंत्र्यांची जपान वारी

By Admin | Updated: August 11, 2015 02:02 IST2015-08-11T02:02:42+5:302015-08-11T02:02:42+5:30

मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. प्रकल्पासाठी जापानच्या ‘जायका’चे (जपानी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी)

Japan's Chief Minister for Sewri-Nhava Sheva Setu | शिवडी-न्हावाशेवा सेतूसाठी मुख्यमंत्र्यांची जपान वारी

शिवडी-न्हावाशेवा सेतूसाठी मुख्यमंत्र्यांची जपान वारी

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. प्रकल्पासाठी जापानच्या ‘जायका’चे (जपानी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) अर्र्थसाहाय्य घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी पुढील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानचा दौरा करणार आहेत.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा २००९ साली करण्यात आली होती. तब्बल २२ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी सागरी सेतूने मुंबई आणि नवी मुंबईला जोडण्याची योजना होती. मात्र, कधी निविदा प्रक्रिया तर कधी भूसंपादन अशा विविध कारणांमुळे प्रकल्पाचे गाडे अडले होते. राज्यातील बहुतांश पायाभूत प्रकल्पांना अर्थसाहाय्य करणाऱ्या जायकाने या प्रकल्पात रस दाखविल्यामुळे प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. जायकाने या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबाबतचे सर्वेक्षणही पूर्ण केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले, ‘मुंबई महानगरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रकल्प रखडला होता. प्रकल्पासाठी जायकाचे अर्थसाहाय्य घेण्याचे राज्य सरकारने नक्की केले आहे. ८ ते १३ सप्टेंबरदरम्यान मुख्यमंत्री जपान दौऱ्यावर असून, या वेळी या प्रकल्पाबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.’ मुख्यमंत्र्यांच्या जपान दौऱ्यात त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाचे अनावरणही केले जाणार आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या चीन दौऱ्यामुळे जपान दौरा लांबणीवर पडला होता. चीनसह अन्य काही देशांनीही या प्रकल्पात रस दाखवला होता.

सहा पदरी सागरी सेतूचे काय मिळणार फायदे?
२२ किमी लांबीच्या सहा पदरी सागरी सेतूने मुंबई व नवी मुंबईला जोडण्यात येईल.
नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील विकासाचे मार्ग या सागरी सेतूमुळे खुले होणार आहेत.
नवी मुंबईतील प्रस्तावित आंतराष्ट्रीय विमानतळ गाठणे या मार्गामुळे अधिक सुकर होणार आहे.

Web Title: Japan's Chief Minister for Sewri-Nhava Sheva Setu