ऑनलाइन लोकमत
जालना, दि. 4 - जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय माहिती केंद्रातील (एनआयसी) डेटाएंट्रीचे थकित असलेले ६० लाख ९५ हजार ६२७ रूपयांचे देयक मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकाकडून तीन लाखांच्या लाचप्रकरणीनिवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे व अतिक अहेमद शेख यांना गुरुवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
तक्रारदार एजन्सीधारकाने जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीतील डेटाएंट्रीचे काम पूर्ण केले आहे. यापोटी एजन्सीधारकाने ६० लाख ९५ हजार ६२७ रूपयांचे देयक जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले होते. हे देयक मंजुरीसाठी पाठपुरावा केला असता, इतवारे यांनी तेवढा निधी नसल्याचे सांगून ३० लाख मंजूर करतो, मात्र त्यासाठी १५ टक्के म्हणजेच साडेचार लाखांची मागणी केली होती. तक्रारदारदाराने एवढी रक्कम नसल्याचे सांगितल्यानंतर इतवारे यांनी दहा लाखांचा धनादेश देतो. तो वठवून पंधरा टक्के रक्कम देण्याचे कबूल केले. त्यानुसार इतवारे यांनी १० लाख ३६३ रूपयांचा धनादेश दिला. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी कार्यालयात पंचासमक्ष १३ एप्रिल रोजी लाचेची पडताळणी करण्यात आली. पंचासमक्ष निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे ४ लाख ५० हजार रूपयांची मागणी करून तडजोडअंती ३ लाख रूपये स्वीकारण्यास तयार झाले. इतवारे यांनी खाजगी व्यक्ती अतिक यांना बोलावून तक्रारादाराची ओळख करून दिली. सदर रक्कम त्याच्याकडे देण्यास सांगितले. १४ एप्रिल रोजी अतिक याच्याविरूद्ध सापळा लावण्यात आला. बचत भवन येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदारास लाचेची रक्कम घेवून बोलावले. मात्र अतिक याने लाच स्वीकारली नाही. ४ मे रोजी सर्व पडताळणी केल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी इतवारे व अतिक अहेमद शेख यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.