“जय जय महाराष्ट्र माझा" हे महाराष्ट्राचं राज्यगीत गायन, वादनाआधी जाणून घ्या नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 07:46 PM2023-01-31T19:46:37+5:302023-01-31T19:51:41+5:30

राज्यगीत गायन, वादना संदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

"Jai Jai Maharashtra Majha" is the state song of Maharashtra, know the rules before playing and singing | “जय जय महाराष्ट्र माझा" हे महाराष्ट्राचं राज्यगीत गायन, वादनाआधी जाणून घ्या नियमावली

“जय जय महाराष्ट्र माझा" हे महाराष्ट्राचं राज्यगीत गायन, वादनाआधी जाणून घ्या नियमावली

googlenewsNext

मुंबई - कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून अंगिकारण्यात येणार आहे. या राज्यगीतासाठी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील तयार करण्यात आल्या आहेत.  

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अद्यापपर्यंत शासनामार्फत राज्यगीत तयार करण्यात आले नाही अथवा अधिकृतपणे कोणत्याही गीतास राज्यगीताचा दर्जा देण्यात आला नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, राज्याचे अधिकृत राज्यगीत असावे यासाठी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" या कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत "महाराष्ट्राचे राज्यगीत" म्हणून स्विकारण्यात आले आहे. हे राज्यगीत १.४१ मिनिट अवधीचे आहे.

महाराष्ट्राचे राज्यगीत असे आहे :-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा 
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा 
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा 
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा 
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी 
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला 
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा 
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

राज्यगीत गायन, वादना संदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना 

  1. राज्यगीत अंगीकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. 
  2. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.
  3. १ मे, महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायले जाईल. 
  4. राज्यातील शाळामध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, परिपाठ / प्रतिज्ञा /प्रार्थना / राष्ट्रगीत यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल.
  5. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील. 
  6. राज्यगीत सुरु असताना सर्वानी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती याना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.
  7. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/ गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.
  8. वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल. 
  9. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकामध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.
  10. या राज्यगीताच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीसाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त आस्थापनांस / कार्यालयांस सूचना द्याव्यात. 
     

Web Title: "Jai Jai Maharashtra Majha" is the state song of Maharashtra, know the rules before playing and singing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.