हे बुलेट ट्रेनवाल्यांचे नव्हे, रिक्षावाल्यांचे सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 06:40 AM2019-12-20T06:40:49+5:302019-12-20T06:41:14+5:30

मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभंग व भारुडाला त्याच पद्धतीने दिले प्रत्युत्तर

It's not bullet trainers, rickshaw pullers government!; answer to devendra fadanvis by uddhav thackrey | हे बुलेट ट्रेनवाल्यांचे नव्हे, रिक्षावाल्यांचे सरकार!

हे बुलेट ट्रेनवाल्यांचे नव्हे, रिक्षावाल्यांचे सरकार!

Next

नागपूर : ‘पाहुनि सौख्य माझे,  देवेंद्र तोही लाजे,  शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या’
हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन उद्धृत करीत ‘माझे सरकार हे रिक्षावाल्यांचे आहे, बुलेट ट्रेनवाल्यांचे नाही. ते जनतेला चिंतामुक्त आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय राहणार नाही,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.


राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या मुनगंटीवार यांच्या कोटीवर, ‘सुधीर होऊ नका अधीर, झाले तुम्ही बेकार म्हणून अजब वाटते नवे सरकार’, असा चिमटाही त्यांनी काढला.


शाब्दिक कोट्या, बोचरे शब्द यांचा वापर करीत ठाकरे यांनी विरोधकांचा हल्ला परतवला. ‘आपले सरकार त्रिशंकू नाही. हे गोरगरिबांचे सरकार असून राज्यात ज्या विकास कामांना स्थगितीच्या सूचना आहेत त्यातील त्रुटी दूर करून ती सुरू ठेवण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.


पक्षभेदांपलीकडे जाऊन कामे करू, दुजाभाव करणार नाही, अशी ग्वाही देत ठाकरे म्हणाले की, ‘संताचा तो प्रचार अमर... अजूनही लोकमनावर, राज्य चालोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरती’ या राष्ट्रसंतांच्या ओळींप्रमाणे शेवटच्या माणसांसाठी आपल्या सरकारचे काम असेल.


संत गाडगेबाबा यांचा उद्या स्मृतिदिन आहे. त्यांनी साध्यासोप्या भाषेत जीवनाचे सार सांगितले आहे. त्याप्रमाणे भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, वस्र, निवारा देणे, खचलेल्यांना जगण्याची हिंमत देण्याचे काम आपले सरकार करेल. सरकारकडून गाडगेबाबांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांचा बोर्ड आपण मंत्रालयात मोठा करून लावू, असे ते म्हणाले.


भाजपच्या काही नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचे दाखले देत आता याच पक्षाला शेतकºयांचा पुळका आला आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्यात तुम्ही कामे केलीच नाहीत असे मी म्हणणार नाही, पण सध्या मी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतोय. त्यात, रस्ते होईचना, पाणी मिळेचना, अशी अवस्था असल्याची टीका ठाकरे यांनी केली.


आमचे देसाई अन् तिकडे कसाई !
आधीच्या सरकारमध्ये उद्योग खाते शिवसेनेकडे होते हे खरे आहे. आमचे देसाई होते, पण तिकडे कसाईदेखील होते. त्यांनी आणलेल्या नोटाबंदी, जीएसटीमुळे महाराष्ट्रात येऊ पाहणारे उद्योग दुसरीकडे गेले, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला लगावला.

काळा पैसा येईचना अच्छे दिन येईचना
‘काट्याच्या अणीवर बसले तीन गावं, दोन ओसाड, एक वसेचिना’ ही संत ज्ञानेश्वरांची ओळ सांगत तीन पक्षांच्या सरकारचे वर्णन देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर ठाकरे यांनी प्रत्युत्तरात चिमटे काढले तेव्हा एकच हंशा पिकला. ‘अच्छे दिन येता येईचना, १५ लाख खात्यात जमा होईचना, गरिबी हटेचिना, विदेशातील काळा पैसा येईचना, आर्थिक मंदी जाईचना’ या शब्दात त्यांनी भाजपला सुनावले.

Web Title: It's not bullet trainers, rickshaw pullers government!; answer to devendra fadanvis by uddhav thackrey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.