लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा शिकवल्या जातील, या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर काढावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात राज ठाकरे यांनी भुसे यांना पत्र लिहिले आहे. आपल्याच निर्णयावर घुमजाव करून सरकारने हिंदी भाषेची पुन्हा सक्ती केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन करेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी पत्रात दिला आहे.
राज्यात इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा करण्याचा निर्णय राज्याने घेतला होता. या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण पक्षासह अन्य राजकीय पक्ष, संस्था तसेच पालकांनी विरोध केला होता. हा विरोध लक्षात घेता भुसेंनी हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.