मुंबई : राज्यातील शिधावाटपाअंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या रॉकेलच्या कोट्यात कपात केल्याने रेशनिंग दुकानदार संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सोमवारी, २६ जानेवारीला पुण्यातील शिरूर येथे राज्यातील रेशनिंग दुकानदारांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली असून त्यात संपाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान ठाण्यातील रेशनिंग दुकानदारांनी १ फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची हाक दिली असून मुंबई रेशनिंग दुकानदार संघटनेने त्यास पाठिंबा दिला आहे.याबाबत अधिक माहिती देताना अखिल भारतीय राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवाना धारक महासंघाचे प्रवक्ता नविन मारू यांनी सांगितले की शासनाने जानेवारी महिन्यापासून रॉकेलच्या कोट्यात कपात केली आहे. आधीच शासनाकडून रॉकेलचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यात अचानक कोट्यात कपात केल्याने १५ जानेवारीनंतर रॉकेल घेण्यास येणाऱ्या ग्राहकांसोबत दुकानदारांची भांडणे होत आहेत. परिणामी शासनाने तत्काळ निर्णयाला स्थगिती देऊन किमान ८० टक्के पुरवठा करण्याची महासंघाची मागणी आहे.सध्या शासनाकडून एकूण मागणीच्या केवळ २९ टक्के पुरवठा होत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे ग्राहकांना रॉकेल पुरवठा करताना दुकानदारांवर काळाबाजारी करत असल्याचे आरोप होतात. त्यात महिन्याच्या अर्ध्यावरच शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे ग्राहकांना सामोरे जाताना दुकानदारांची पुरती गोची होत आहे. यांसदर्भात ठाण्यातील रेशनिंग दुकानदारांनी १९ जानेवारीला कळव्यात बैठक घेऊन संपाचा निर्णय घेतला आहे. तर मुंबईच्या दुकानदारांनी त्यांना केवळ पाठिंबा जाहिर केला असून संपाचा निर्णय राज्यव्यापी बैठकीतच घेतला जाईल. दरम्यान रेशनिंग दुकानदारांच्या इतर प्रश्नांबाबतही चर्चा होणार असल्याचे मारू यांनी सांगितले.
राज्यात पेटणार रॉकेलचा प्रश्न!
By admin | Updated: January 26, 2015 04:11 IST