Deputy CM Eknath Shinde News: एकीकडे देशात पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असताना, दुसरीकडे राज्यात मात्र अनेक पक्षांना आता महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेक पक्षांतील तयारीला आता हळूहळू वेग येताना पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना शिंदे गटाकडून उद्धवसेनेला हादरे देण्याचे काम सुरूच असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे अनेक जण शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका कार्यक्रमात मजेशीर प्रकार घडला.
खरी शिवसेना कोणाची? यावरून शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात नेहमीच आरोप-प्रत्यारोप होत असतात. यातच मध्यंतरी आलेल्या धर्मवीर आणि धर्मवीर २ या चित्रपटांमुळे या दोन्ही गटातील दावे-प्रतिदावे आणखी तीव्र झाले. राजकीय वर्तुळात या चित्रपटाची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत असतात. अशाच एका कार्यक्रमाला गेले असताना, ते सभागृहात पोहोचताच एका चिमुकलीने हे रिअल शिंदे आहेत का? असा प्रश्न पालकांना विचारल्याचे समजते.
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न
मिळालेल्या माहितीनुसार, शरद कुलकर्णी लिखित 'ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट' पुस्तकाचे प्रकाशन डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. शिंदे यांचा सभागृहात प्रवेश झाल्यानंतर त्यांना पाहून दुसरीत शिकणारी मुलगी तिच्या पालकांना जोरात म्हणाली, हे रिअल शिंदे साहेब आहेत का? हे ऐकताच आजूबाजूचे लोक हसू लागले. अनेकांना वाटले की, धर्मवीर चित्रपट पाहिल्याने लहानगी तसे विचारत असेल. त्यावर तिची आई म्हणाली, ती नेहमीच शिंदेंना टीव्हीमध्ये पाहते. आज प्रत्यक्षात तिने पाहिल्याने तिला हा प्रश्न पडला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या, तर ठाकरेंना २० जागांवर समाधान मानावे लागले. यानंतर आता येणाऱ्या मुंबईसह राज्यभरातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना शिंदे गट आपली लय कायम ठेवत, ठाकरे गटाचा चितपट करणार का की ठाकरे गट किमान मुंबई महापालिकेतील सत्ता कायम राखण्यात यशस्वी होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे.