Shiv Sena Shinde Group News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाने वेग घेतल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, महाविकास आघाडीचे काय होणार, महायुतीला याचा कितपत फटका बसेल, अशा अनेक मुद्द्यांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यता गेल्या काही दिवसांत बळावल्यामुळे शिवसेना शिंदे गटासह महायुतीत होणाऱ्या पक्षप्रवेशाने काहीसा ब्रेक लागल्याचे म्हटले जात होते. अशातच यवतमाळमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले. परंतु, याच पक्षप्रवेशावेळी एक मजेशीर किस्सा घडला आणि त्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगल्याचे सांगितले जात आहे.
नेर नगरपालिकेचे उबाठाचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, माजी नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल, माजी नगराध्यक्ष वनिता मिसळे, नगरसेवक संदीप गायकवाड, दिलीप म्हस्के, साजिद शरिफ, नगरसेविका सरिता सुने, नगरसेविका दर्शना इंगोले, उबाठाचे अल्पसंख्याक आघाडी माजी जिल्हाध्यक्ष रिझवान खान, गणेश शीलकावार, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लोकेश इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य राकेश नेमनवार, पंचायत समिती उपसभापती संतोष बोडेवार, माजी सभापती अभय डोंगरे, विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलास ठाकरे, संचालक राहुल देहणकर, उबाठाचे महागाव शहर समन्वयक अविनाश देशमुख, तेजस ठाकरे, उबाठाचे सवनाचे पदाधिकारी रुपेश ठाकरे, अमोल जाधव, शुभम राठोड, निलेश भारती या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. परंतु, यातील तेजस ठाकरे या नावामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांची फिरकी घेतल्याचे म्हटले जात आहे.
थांबा, थांबा, हा तो तेजस नाही
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, अशा चर्चानी वातावरण तापलंय. त्यातच एकनाथ शिंदेंनी ठाण्यात एक ठाकरी बॉम्ब टाकला. पक्षप्रवेशातली नावं वाचताना शिंदेंच्या तोंडून निघालं... आणि तेजस ठाकरे!.... ते ऐकताच मीडियाची नजर चमकली, कॅमेरे झूम झाले, भुवया उंचावल्या, गुगल सर्च सुरू झाले. 'उद्धवजींचा तेजस ? शिंदेंकडे? कुणी धक्का दिला?' पण लगेच खुलासा आला, 'थांबा थांबा, अरे! हा तो तेजस नाही. हे यवतमाळचे नेताजी. नाव एक असलं तरी घराणं वेगळं!' अशी मिश्किली करत शिंदेंनी त्यांना 'खऱ्या शिवसेनेत आलायत बरे!' असे म्हटले. खरे तर शिंदेंनी हा नामोल्लेख 'तेजस' पद्धतीनेच का केला बरे? असे बोलले जातेय. आता तेजस ठाकरे यावर काय म्हणतात हे बघावे लागेल, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पश्चिम विदर्भातील १० हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. यवतमाळमध्ये पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून विदर्भातील किमान १० हजार कार्यकर्ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.