मुंबई: अग्निशमन दलातील जवानांना २००९ मध्ये देण्यात आलेले पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) खरेदीत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचा ठपका लेखापरीक्षण विभागाने ठेवला आहे़ हा धक्कादायक अहवाल स्थायी समितीमध्ये आज सादर करण्यात आला़ मात्र आॅडिट अहवालानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली नसल्याचे आज उजेडात आले़काळबादेवी येथील आगीच्या दुर्घटनेनंतर जवानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ जवानांच्या सुरक्षेसाठी २००९ मध्ये पीपीई हा अद्ययावत गणवेष देण्यात आला होता़ या गणवेषाचा दर्जा आणि त्याच्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत़ मात्र २,३२० जवानांसाठी घेण्यात आलेल्या या गणवेषाच्या खरेदीत अनियमितता असल्याचे ताशेरे लेखापरीक्षकांनी २०१३ मध्ये ओढले होते़ या प्रकरणात अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ठपका ठेवण्यात आला होता़हा खळबळजनक अहवाल स्थायी समितीच्या पटलावर आज मांडण्यात आला़ खरेदी केलेले २,३२० पैकी ६२० गणवेष वापरले, तर १,७०० संच अद्यापही वापरात नाहीत़ चीनमधून हे साहित्य आणले असल्यास कस्टम व जकात पावती ठेकेदाराने का सादर केलेली नाही, यावर लेखापरीक्षकांनी शंका उपस्थित केली आहे़ परंतु सर्व गणवेष वापरात असल्याचे मोघम स्पष्टीकरण देत अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी यावर अधिक भाष्य टाळले़ अहवालानंतरची कारवाईपीपीई खरेदीतील अनियमिततेमुळे गेल्या वर्षी हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते़ तसेच स्टोअर्स डिपार्टमेंट आणि खरेदी विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले़ संबंधित ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली़ ठेकेदारांकडून मिळणाऱ्या गणवेषाचा दर्जा चांगला नसल्यामुळे जवान पुरवठादाराकडून पैसे घेऊन स्वत: गणवेष खरेदी करीत असत, हेही त्या वेळीस उजेडात आले होते़ मात्र या प्रकरणात ठपका ठेवलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी उजेडात आली नाही़ (प्रतिनिधी)
जवानांच्या गणवेष खरेदीत अनियमितता
By admin | Updated: May 14, 2015 02:38 IST