ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ७ : राज्यातील सहकारी साखर कारखान्याची विक्री करीत अनेकांनी खाजगी कारखाने उभे केले. यामध्ये साखर कारखानदारांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्ठाचार केला आहे मात्र यामध्ये राजकारण होत असल्याने कारवाई होत नाही. यासाठी मी ईडीच्या संचालकांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ही कारवाई होण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे खा. राजू शेट्टी म्हणाले. नूतन आ. सदाभाऊ खोत यांच्या सत्कारानिमित्त मंगळवारी पंढरपूरात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, दीपक भोसले, विष्णू बागल आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील ३५ खाजगी कारखान्याची मालमत्ता ही दहा हजार कोटींची आहे. मात्र प्रत्यक्षात कागदोपत्री ती १० कोटीची दाखविली आहे. यामध्ये खूप मोठा भ्रष्ठाचार झाला असून याची चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र राजकीय अडचणीमुळे कारवाई होत नसल्यामुळे मी ईडीच्या संचालकांना भेटून कारवाईची मागणी केली आहे. मात्र गुन्हा दाखल झाला असेल तर ईडीला चौकशीचे अधिकार असल्यामुळे मी जनहित याचिका दाखल करणार आहे. नुकतीच ऊस दर नियंत्रक समितीचे साखर आयुक्तांसोबत बैठक झाली असून एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यामुळे राज्यातील काही कारखान्यांना दंड केला असून काहींचे गाळप परवाने रद्द केले आहेत. मागील सरकारपैक्षा हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासांठी काम करीत असून काही निर्णय अद्याप प्रलंबित आहेत. यासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. मागील तीस वर्षे चळवळीत प्रामाणिकपणे काम केलेल्या सदाभाऊंना उशीरा का होईना पण न्याय मिळाला आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर भाजपासोबत युती केली असून यावेळी माढ्याची जागा देण्याची मागणी केली होती. ती स्व. मुंडे यांनी मान्य केली. सोलापुर जिल्ह्यात चळवळ संपवण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले मात्र चळवळ संपली नाही. उलट संघटना वाढतच गेल्यामुळे प्रस्थापितांदा धक्का बसला असल्याचेही खा.शेट्टी यावेळी म्हणाले. कर्जमुक्ती देशव्यापी अभियान सुरू राज्यातील शेतकऱ्यांना कर्जामुळे आत्महत्या कराव्या लागत आहेत. मात्र शासनाची मदत वेळेवर मिळत नाही. यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळण्यासाठी देशव्यापी अभियान सुरू केले आहे. याची सुरूवात तुळजापूर येथे नुकतीच केली आहे. पुढील महिन्यात दिल्ली येथे यासाठी एका सेमिनारचे आयोजन केले आहे. लवकरच प्रत्येक गावातील शेतकऱ्यांकडून कर्जासंदर्भात फॉर्म भरून घेण्यात येणार असल्याचेही खा. शेट्टी म्हणाले.