मुंबई : अवैध खाणकामाला चाप बसविणाऱ्या मायनिंग सर्व्हिलन्स सिस्टिमचे (एमएसएस) उद्घाटन केंद्रीय ऊर्जा व खनिकर्ममंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते शनिवारी नवी दिल्लीत झाले. यावेळी त्यांनी ११ राज्यांमधील पत्रकारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. लोकसहभागातून अवैध खाणकामावर नियंत्रण हे या सॅटेलाइट प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. या सिस्टिममध्ये सर्व प्रकारच्या खाणींवर सॅटेलाइटद्वारे नजर ठेवली जाईल; त्या-त्या खाणक्षेत्रातील बारीकसारीक हालचाली टिपल्या जातील. त्यासाठी अॅटोमॅटिक रिमोट सेन्सिंग डिटेक्शन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. इंडियन ब्युरो आॅफ माइन्सने ही सिस्टिम विकसित केली असून त्यासाठी भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अप्लिकेशन्स अॅण्ड जिओ-इन्फॉर्मेटिक्स; गांधीनगर तसेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे सहकार्य लाभले आहे. या सिस्टिममुळे खाणीच्या ५०० मीटरच्या परिसरात संशयास्पद हालचाली २४ तास टिपल्या जाणार आहेत आणि लगेच सुरक्षा यंत्रणेला सतर्क केले जाईल. या सिस्टिमअंतर्गत एक मोबाइल अॅप विकसित करण्यात आले आहे. त्याद्वारे संबंधित अधिकारीच नव्हे तर सामान्य जनतादेखील अवैध खाणकामासंदर्भातील माहिती देऊ शकेल. अशा प्रकारे अवैध खाणकामाला तत्काळ पायबंद घातला जाईल आणि नेमकी काय कारवाई करण्यात आली याचा अहवालही सिस्टिमममध्ये येईल. (विशेष प्रतिनिधी)- देशात आजमितीस ३ हजार ८४३ मोठ्या खाणी आहेत. त्यातील १ हजार ७१० कार्यान्वित तर २ हजार १३३ बंद आहेत. कार्यरत खाणी आधीच डिजिटल करण्यात आल्या असून बंद खाणीही डिजिटल करण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. गौण खनिजांच्या खाणींसाठीही एमएसएस ही सिस्टिम राज्यांच्या सहकार्याने बसविण्यात येणार आहे. त्यासाठी छत्तीसगड, हरियाणा आणि तेलंगण या तीन राज्यांची पथदर्शी प्रकल्पांकरता निवड करण्यात आली असल्याचे गोयल यांनी पत्रकारांना सांगितले.
अवैध खाणकामाला बसणार चाप
By admin | Updated: October 16, 2016 00:33 IST