मुंबई : निवडणुक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही शिवसेना, भाजपात तणातणी सुरु आहे. आचारसंहिता सुरु असताना आणि प्रचार थांबलेला असताना मुख्यमंत्री खिशाला कमळाचे चिन्ह लावून मुलाखती देत आहेत. त्यामुळे आचारसंहिता भंग होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर, शिवसेनेला रडीचा डाव खेळण्याची सवय लागल्याचे प्रतिउत्तर भाजपाने दिले आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार संजय राऊत, अनिल देसाई यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अधिकारांच्या गैरवापराचा आरोप केला. मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असून हा आचारसंहितेचा भंग असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचे सेना नेत्यांनी सांगितले. सेनेचे आरोप म्हणजे रडीचा डाव असल्याचे उत्तर भाजपा प्रवक्ता माधव भांडारी यांनी दिले. पराभूत मानसिकतेतून हा थयथयाट चालू आहे. भाजपाविरोधात आचारसंहिता भंगाच्या रोज दोन-तीन तक्रारी दाखल केल्या जात आहेत. ६० जागा लढवायची ताकद नसलेल्या पक्षाकडे इतके लक्ष का देताय, असा टोेमणा भांडारींनी लगावला. (प्रतिनिधी)
मुलाखतींवरून शिवसेना भाजपात तणातणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 04:21 IST