मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती, उपसभापती ही संवैधानिक पदं आहेत. या पदांवर असणाऱ्यांनी सभागृहात काही सांगितले तर त्याकडे आदेश म्हणून पाहिले जाते. मात्र विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यानांच महावितरणच्या अधिक्षक अभियंत्याने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत. मौजे धामारी, ता. शिरुर, जि. पुणे येथील शेतात महावितरणच्या चुकीमुळे शॉटसर्किट झाले आणि त्यातून लागलेल्या आगीत डावखरे यांच्या शेतातील सगळा ऊस व ठिबक सिंचन योजना जळून खाक झाली. याचा पंचनामा झाला, सगळे शासकीय सोपस्कार पूर्ण झाले. नियमानुसार झालेली नुकसान भरपाई मिळावी म्हणून पुण्याचे अधिक्षक अभियंता नागनाथ येरवाडकर यांच्याशी डावखरे स्वत: दोन तीन वेळा बोलले. त्यांना वाटले काम होईल. दिवाळीनंतर डावखरे गावी गेले. त्यांनी येरवाडकर आणि कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर यांना बोलावून घेतले. काय अडचण आहे, असे विचारले तेव्हा त्यांनी आपली फाईल मुंबईला व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांच्याकडे पाठवल्याचे सांगितले. त्यांच्यासमोरच डावखरेंनी मेहतांना फोन लावला. तर त्यांनी अशी कोणतीही फाईल आपल्याकडे आली नसल्याचे सांगितले.नंतर डावखरे स्वत: अधिक्षक अभियंत्याच्या कार्यालयात पुण्याला गेले. रक्कम किती हे महत्वाचे नाही, पण ज्या पध्दतीने चालढकल केली जात होती त्यावर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही दिवसांनी येरवाडकरांनी डावखरेंच्या खाजगी सचिवांना कोरा धनादेश दाखवला. म्हणाले, मुंबईत एमडी साहेबांनी सही केली की इकडे मी रक्कम टाकून संध्याकाळपर्यंत खांडेकर चेक घेऊन येतील. ती संध्याकाळ अजूनही आलेली नाही. (विशेष प्रतिनिधी)
उपसभापतींवरच अन्याय
By admin | Updated: November 21, 2014 02:46 IST