मुंबई : शीना बोराचे वांद्रे येथील नॅशनल कॉलेज येथून अपहरण केल्यानंतर कारमध्ये खून करून तिघे जण मृतदेहासह वरळीतील निवासस्थानी आले होते. या संपूर्ण घटनाक्रमाची खार पोलिसांनी रविवारी सकाळी पुन्हा एकदा आरोपींकडून माहिती जाणून घेतली. तिघांना घटनास्थळी फिरवून त्याबाबत विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पेण येथे मृतदेह पुरलेल्या ठिकाणची माती आणि सांगाड्याच्या डीएनए नमुन्याचे अहवाल उद्या (सोमवारी) फॉरेन्सिक लॅबकडून पोलिसांना मिळणार आहेत. आत्तापर्यंत १८पैकी ८ चाचण्यांचे रिपोर्ट शीनाशी मिळतेजुळते असून, उद्याच्या अहवालातून एकही बाब तपासाला पूरक ठरल्यास मृतदेह शीनाचा असल्याचे स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.साडेतीन वर्षांपूर्वी इंद्राणी मुखर्जीने संजीव खन्ना व कारचालक श्याम राय याच्या मदतीने शीना बोराची हत्या केल्यानंतर मृतदेह पेणमधील निर्जन झाडीत पुरला होता. खार पोलिसांना या खुनाचा उलगडा झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांत घटनास्थळाचा पूर्ण परिसर धुंडाळून काढला. या ठिकाणी मानवी सांगाड्याचा काही भाग मिळाला, शीनाचा भाऊ मिखाईलला मारून त्यात मृतदेह भरण्यासाठी आणलेली बॅग जप्त केली. त्याचप्रमाणे तेथील मातीचे नमुने घेऊन ते न्यायवैद्यक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यापूर्वी नायर रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालात मृतदेहाचे वय २० ते २५ असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला मोठे बळ मिळाले. त्यानंतर डीएनए नमुन्याचे अहवालही तपासाला पूरक ठरल्यास गुन्हा सिद्ध होण्यासाठी पुराव्याच्या दृष्टीने ही मोठी बाब ठरणार आहे.शीना हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा नवरा संजीव खन्ना आणि चालक श्याम राय यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपत आहे. त्यामुळे दुपारी त्यांना वांद्रे येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. अद्यापही काही महत्त्वपूर्ण बाबींचा उलगडा न झाल्याने त्याच्या पोलीस कोठडीची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात येईल, असे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.कोलकात्यात चौकशी : पोलिसांनी शीनाच्या हत्येप्रकरणी तिघा आरोपींना साहाय्य केल्याच्या संशयावरून कोलकात्यातील एका शरीर रक्षकाला (बॉडी गार्ड) चौकशीसाठी पाचारण केले आहे. त्याच्या सहभागाबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. या प्रकरणात डीएनए सॅम्पल महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे तपासात पहिल्यांदाच मुंबई पोलिसांनी डिजिटल फेशियल इम्पोजिशनची मदत घेतली. यात संगणकाच्या साहाय्याने कवटीनुसार चेहरा तयार केला जातो. या प्रकरणात कॉम्प्युटर, फोन, स्काईपचा वापर झाल्याने सायबर तपासही महत्त्वाचा आहे. पोलीस तिन्ही आरोपीकडे सतत चौकशी करीत आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या शिफ्टमध्ये ड्युटी लावलेल्या आहेत. अनेक पोलीस चालक श्याम रायच्या अटकेच्या दिवसानंतर घरी गेलेले नाहीत. इंद्राणी मुखर्जीने गुन्हा करताना कोणतेही पुरावे मागे न ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र तरीही पोलिसांनी महत्त्वपूर्ण दुवे मिळविले.
इंद्राणीसह तिघांची पुन्हा वांद्रे कॉलेज ते वरळीपर्यंत परेड
By admin | Updated: September 7, 2015 02:40 IST