Congress Harshwardhan Sapkal: इंदिरा गांधी यांनी १९७५ साली तत्कालीन परिस्थितीमुळे आणीबाणीचा निर्णय घेतला होता. या आणीबाणीचे समर्थन विनोबा भावे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधी यांना त्यावेळी दोन पत्रे लिहिले होती, त्यात घालीन लोटांगण, हाच प्रकार आहे. ती पत्रे का लिहिली होती, हेही तपासले पाहिजे, असे म्हणत आणीबाणीत काही प्रशासकीय चुक्या झाल्या पण काही इष्टही झाले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी १९७५ साली संविधानातील कलमानुसार आणीबाणीचा निर्णय घेतला होता, नंतर त्यांनी ती उठवली. मतचोरी न करता निवडणुका घेतल्या. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आणीबाणी ही चूक झाली, हेही त्यांनी मान्य करत माफी मागितली. १९८० मध्ये देशातील जनतेने त्यांना पुन्हा बहुमताने विजयी केले. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनीही नंतर आणीबाणीच्या काळात प्रशासनाच्या हातून काही चुका झाल्याचे मान्य केले आहे. आणीबाणी हा वेगळा अध्याय आहे. १९७१ च्या युद्धात लष्काराला तेल देणार नाही, अशी भूमिका तेल कंपन्यांनी घेतली होती, त्यामुळे नंतर या तेल कंपन्या व काही बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले, असे सपकाळ यांनी सांगितले.
आणीबाणीने देशाला शिस्त लागली हे मात्र कोणी बोलत नाही
आणीबाणीने देशाला शिस्त लागली हे मात्र कोणी बोलत नाही. काळाबाजार, भ्रष्टाचार करण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती. आज मात्र याच्या नेमके उलट होत आहे. आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. भाजपाच्या हुकूमशाहीत ३००० कोटींचे जास्तीचे टेंडर खास उद्योगपतीला दिले होते ते सुप्रीम कोर्टाने रद्द केले. धारावी अदानीला विकली, विमानतळ दिले. मराठीवर अतिक्रण करण्याचे काम याच हुकूमशाहीने होत आहे. संस्कृती व सभ्यतेवर घाला घातला जात आहे तोही याच हुकूमशाहीने असेही सपकाळ म्हणाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यपत्र शिदोरी मासिकाचा आणीबाणीवरील विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.