नरेंद्र मोदी यांचा मंत्र : ‘एनटीपीसी’च्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पणनागपूर : देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी ऊर्जाक्षेत्राची भूमिका मोलाची ठरणार आहे. केंद्र सरकार वीज उत्पादन वाढविण्यास कटिबद्ध आहे. जनतेनेही वीज बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीज वाढवा, वीज वाचवा, असा मंत्र दिला. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या (एनटीपीसी) १००० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाचे राष्ट्रार्पण गुरुवारी पंतप्रधानांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल के.शंकरनारायणन, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार कृपाल तुमाने, एनटीपीसीचे मुख्य प्रबंध संचालक डॉ. अरुण रॉय चौधरी, ऊर्जा मंत्रालयाचे अप्पर सचिव देवेंद्र चौधरी यावेळी उपस्थित होते.‘देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास विजेच्या माध्यमातून होऊ शकतो. ग्रामीण भागात विजेच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात वीज पोहोचावी, ही केंद्राची प्राथमिकता आहे. विजेचे उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वीज आली की उद्योग येतात आणि पर्यायाने रोजगार निर्माण होतात.जिथे-जिथे आणि ज्या ऊर्जा स्रोतातून शक्य होईल तेथून वीजनिर्मिती करण्यात येईल, असे मोदी म्हणाले. एनटीपीसीच्या या प्रकल्पामुळे विदर्भातील जनतेचा व शेतकऱ्यांचा फायदा होईल, असे ते म्हणाले. केंद्र शासनाने देशात वीजनिर्मितीच्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या आहेत. भूतान, नेपाळ या शेजारच्या देशांमध्येही वीजनिर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहे. सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती करणारे संयंत्र देशभरात सौरशक्तीच्या उपलब्धतेनुसार लावण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विजेचा उपयोग करून आज देशातील शेतकरी उत्पादनक्षम शेती करीत असल्याचे गौरवोद्गार काढत पंतप्रधान म्हणाले, सावकारी कर्जाच्या पाशामुळे देशाच्या काही भागातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना फायद्याची ठरणारी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारी प्रधानमंत्री जन-धन योजना सरकारने आणली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाचे बँक खाते उघडण्यात येणार आहे. खातेदाराने कुटुंबाचे खाते उघडताच केंद्र सरकार खातेदाराच्या कुटुंबाचा एक लाख रुपयाचा विमा काढणार आहे.नागपूर देशात ऊर्जाकेंद्र बनणारनितीन गडकरी यांनी एनटीपीसीच्या या प्रकल्पामुळे नागपूर देशात ऊर्जाकेंद्र बनणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच वीजनिर्मितीमुळे या परिसराचा विकास होऊन उद्योग येतील. परिणामी रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच नागपूर विभागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी १००० शौचालय बांधण्यासाठी एनटीपीसी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली.
वीज वाढवा, वीज वाचवा!
By admin | Updated: August 22, 2014 01:37 IST