विशेष प्रतिनिधी मुंबई : ग्रामपंचायत कार्यालयासाठी इमारत, दहनभूमी आणि दफनभूमीसाठीची असलेली १० लाखांची तरतूद वाढविण्यासाठीचा प्रस्ताव नियोजन विभागाला देण्यात आला असून, यासंदर्भात पाठपुरावा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत दिली.कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत जनसुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येत असलेल्या अनुदानाबाबत सदस्य अमल महाडीक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. सदस्य चंद्रदीप नरके, सुभाष साबणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ग्रामपंचायतींना जनसुविधा देण्यासाठीचे विशेष अनुदान हे नियोजन विभागाच्या माध्यमातूनच दिले जाते. हा निधी वाढविण्यासाठी नियोजन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल. हे वाढीव अनुदान दफन आणि दहनभूमीसोबत ग्रामपंचायत कार्यालयासाठीही लागू आहे. महिला सक्षमीकरण अभियानासाठी ५००० गावांमध्ये इमारतींची आवश्यकता आहे. गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालयासाठी इमारती २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्याचे प्रस्तावित आहे, असे राज्यमंत्री म्हणाले.
ग्रामपंचायतींच्या अनुदानात वाढ करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:48 IST