सुखद घोषणा : दोन वर्षांत कोस्टल रोड, नवी मुंबईतून २०१९मध्ये उड्डाणमुंबई- मुंबईतील चटई निर्देशांक (एफएसआय) वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. मुंबईतील कोस्टल रोडची उभारणी दोन वर्षांत करण्यात येईल आणि ट्रान्स हार्बर लिंकचे काम याच वर्षात सुरू केले जाईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले. राज्य सरकार व मुंबई फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मुंबई नेक्स्ट’ या परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. २०१९मध्ये नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण होणार असल्याचा पुनरुच्चार करून कोस्टल रोडसाठी तीन महिन्यांत सर्व परवानग्या प्राप्त करून केवळ दोन वर्षांत त्याची उभारणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. कोस्टल रोड प्रकल्पाकरिता लोकांचे स्थलांतर करावे लागणार नसल्याने दोन वर्षांचा कालावधी पुरेसा असल्याचे ते म्हणाले. वांद्रे-कुर्ला संकुलासारखी नागरी आर्थिक केंद्रे ठिकठिकाणी सुरू करण्यात येतील़ भिवंडी येथे लॉजिस्टिक हब सिटी तर कल्याणजवळ नवीन शहराची उभारणी करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. दुबई, हाँगकाँग किंवा शांघायप्रमाणेच मुंबईला ग्लोबल फायनान्शियल सेंटर करण्याकरिता येत्या अर्थसंकल्पात कररचनेत बदल करून ती सुटसुटीत केली जाईल. मात्र अर्थसंकल्प तोंडावर असल्याने याबाबत अधिक भाष्य करता येणार नाही, असे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले. कोस्टल रोड व ट्रान्स हार्बर लिंक या दोन प्रकल्पांकरिता केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही सिन्हा यांनी जाहीर केले. महाराष्ट्राला सहकार्य- नायडूउत्तुंग इमारती आणि बॉलीवूड म्हणजे मुंबईचा विकास नव्हे, अशा शब्दांत नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कानपिचक्या देताना ‘बेसिक फर्स्ट’ ही आपली घोषणा आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर या कामाकरिता महाराष्ट्र सरकारला आपल्या खात्याकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नायडू यांनी दिले. ‘अच्छे दिन कुठे आहेत’ असा सवाल करणाऱ्यांनी राज्यसभेत सरकारला स्पष्ट बहुमत नाही हे लक्षात घ्यावे, असे नायडू म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)मुंबई शहरातील एफएसआय १.३३पेक्षा अधिक वाढवला तर शहराची लोकसंख्या अफाट वाढून शहराच्या नागरी सुविधांवर ताण पडेल अशी भीती वाटल्याने आतापर्यंत एफएसआय वाढवला नव्हता. परंतु ते धोरण चुकीचे होते हे आता स्पष्ट झाल्याने मुंबईतील एफएसआय वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी जाहीर केले. विजय दर्डांचा आग्रहजगातील इतर देशांची उदाहरणे देत ‘लोकमत’चे चेअरमन तथा खासदार विजय दर्डा हे एफएसआय वाढीबाबत वेगवेगळ्या व्यासपीठांवर मागणी करीत आले आहेत.
मुंबईत एफएसआय वाढवणार - मुख्यमंत्री
By admin | Updated: February 7, 2015 03:00 IST