बोर्डी : गुजरातच्या उंबरगाव शहरात परराज्यांतून आलेल्या सव्वीसवर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, उंबरगावच्या औद्योगिक वसाहतीत जाणाºया पालघर जिल्ह्यातील कामगारवर्गाला यामुळे आणखी काही दिवस घरीच बसावे लागू शकते. त्यामुळे अडचणीत वाढ होण्याची भीती या कामगारांकडून व्यक्त होत आहे.
उंबरगाव शहरातील गांधीवाडी येथे परगावातून आलेल्या या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. शहरातील औद्योगिक वसाहतीत परराज्यातील कामगारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये पालघर जिल्हा आणि मुंबईतील कामगारांचा समावेश आहे. लॉकडाउनपूर्वी हे कामगार ये - जा करायचे.
मात्र, दोन महिन्यांपासून कामगारांना सुट्टी देण्यासह महाराष्ट्रातून येणाºया वाहनांवर बंदी घालण्यासाठी गुजरात प्रशासनाने सीमेलगतच्या मार्गावर मध्यभागी पत्रे लावून तो बंद केला. त्यानंतर दोन्हीकडच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु शासनाने निर्णय माघारी घेतला नाही. दरम्यान, त्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याच्या अहवालानंतर प्रशासनाच्या निर्णयाचे महत्त्व तेथील नागरिकांना पटले. त्यामुळे यापुढे परगावांतील व्यक्तींना येथे येण्यास रोखण्याबाबत तेथील जनताही आग्रही असल्याचे समजते.
दरम्यान, चौथ्या लॉकडाउन काळात नियम शिथिल झाल्यानंतर काही अटींवर वसाहतीतील कारखाने सुरू झाले. दोन महिने बेरोजगारीचा फटका सहन करणाºया जिल्ह्यातील मजूरवर्गाने वैद्यकीय चाचणी करून कामाला जाण्याच्या हालचाली सुरू केल्या. परंतु, येथे रुग्ण आढळल्याने बाहेरील कामगारांना आणखी काही दिवस रोखण्याचा निर्णय होऊ शकतो.