मुंबई - मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे (वय ३५) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) लाच घेतल्याप्रकरणी अटक केल्यानंतर त्याच्या कार्यालयातून ४२ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच ढेरिंगे याच्या नाशिकच्या घरी छापा टाकून सर्च ऑपरेशन करण्यात आले. त्याच्यासोबत या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास एसीबीकडून सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांकडील अपील अर्जावर सकारात्मक निर्णयासाठी लाच मागितल्याचे तपासात समोर आले. गुरुवारी न्यायालयाने ढेरिंगेला पाच दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मंत्रालयात सापळा रचून रंगेहाथ अटक
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मेडिकल स्टोअरला औषध निरीक्षक, झोन २ यांनी भेट देऊन लायसन्ससंदर्भात ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी मौखिक सुनावणी घेत तक्रारदार यांचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात तक्रारदाराने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाकडे अपील सादर केले होते. तक्रारदाराने ढेरिंगे यांची भेट घेतली तेव्हा त्याने ५० हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने ९ फेब्रुवारी रोजी एसीबीकडे धाव घेत तक्रार दिली. एसीबीने गुरुवारी मंत्रालयात सापळा रचून ढेरिंगेला रंगेहाथ पडकले.
एसीबीच्या पथकाने मंत्र्यांच्या कार्यालयातील ढेरिंगे यांच्या टेबलाची झाडाझडती घेतली. तेव्हा ढेरिंगे यांच्या टेबलाच्या खणात अतिरिक्त ४२ हजार रुपये एसीबीच्या हाती लागले. या रोकडबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. तसेच त्याच्या नाशिकच्या घरात सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. त्याच्या मालमत्तेचा लेखाजोखाही एसीबीकडून काढण्यात येत आहे. तसेच गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का? याबाबतही कसून चौकशी सुरू आहे.
...तर मी राजीनामा देईनमंत्रालयातील आपल्या दालनात लिपिकला लाच घेताना रंगेहाथ पकडले जाण्याचा प्रकार चुकीचाच आहे. माझ्यावर याची जबाबदारी असून या लाचखोरीची पाळेमुळे माझ्यापर्यंत आली तर मी निश्चितच राजीनामा देईन. कोणालाही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. - नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री
राज्याच्या प्रशासनाचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयातच जर खुलेआम लाचखोरी चालत असेल, तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? ‘त्या’ लिपिकाला निलंबित करून याचे धागेदोरे वरपर्यंत पोहोचले आहेत का? याची सखोल चौकशी करा. - खा. वर्षा गायकवाड, अध्यक्षा, मुंबई काँग्रेस
Web Summary : A clerk in the Food and Drug Administration was arrested for accepting a bribe related to an appeal. ₹42,000 cash seized from his office. Investigations are ongoing to determine if others were involved. Minister promises resignation if linked.
Web Summary : खाद्य एवं औषधि प्रशासन के एक क्लर्क को रिश्वत लेने के आरोप में गिरफ्तार किया गया। कार्यालय से 42,000 रुपये नकद जब्त। जांच जारी है कि क्या अन्य लोग शामिल थे। मंत्री ने लिंक होने पर इस्तीफे का वादा किया।