जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीतील खंडेरायाच्या मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्तांच्या मनमानी कारभाराविरुद्ध जेजुरीकर ग्रामस्थांच्या संतापाचा शुक्रवारी उद्रेक झाला. विश्वस्त मंडळ बरखास्त करा, यांसह इतर मागण्यांसाठी जेजुरीकरांनी उस्फूर्त बंद पाळला. यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. ग्रामस्थांनी विश्वस्तांच्या निषेधाच्या घोषणा देत शहराच्या मुख्य चौकातून निषेध मोर्चा काढला. यामध्ये खंडोबादेवाचे धार्मिक विधी करणारे अठरापगड जाती-धर्मातील मानकरी, सेवेकरी सहभागी झाले होते. मोर्चात महिलावर्गाचा सहभाग लक्षणीय होता. निषेध मोर्चा मुख्य चौक व बाजारपेठेतून जाताना विश्वस्तांच्या घरापुढे बोंबाबोंब करण्यात आली.पुणे येथील सहधर्मादाय आयुक्त शि. ग. डिगे यांनी खंडोबाचे मूळ स्थान असलेले कडेपठार देवसंस्थान बरखास्त केले असून ते मार्तंड देवसंस्थानमध्ये विलीन करण्याचा विचार आहे. तसेच खंडोबा मंदिरातील त्रिकाळपूजेव्यतिरिक्त दररोज होणाऱ्या पाद्यपूजा बंद करून या पूजा पंचलिंगावर घेण्याचे आदेश सहधर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. गडकोटाच्या पश्चिम दिशेला असलेला पायरीमार्ग व मार्ग दुरुस्त करण्याचे धोरण देवसंस्थानचे आहे, आदी निर्णयांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमध्ये उमटल्या आहेत. यापूर्वीही मुख्य मंदिरातील पूजेच्या उत्पन्नातील वाटा हिश्श्याबाबत झालेल्या निर्णयामुळे नाराजीचे वातावरण होते. (प्रतिनिधी)त्रिकाळपूजेव्यतिरिक्त पाद्यपूजेला घातलेल्या बंदीचा निर्णय हा देवसंस्थानच्या विश्वस्तांना विचारात घेऊन तसेच परिस्थितीची माहिती घेऊन सहधर्मादाय आयुक्तांनी घेतला आहे. भाविकांच्या सोई-सुविधेसाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. - दशरथ घोरपडे,देवसंस्थानच प्रमुख विश्वस्त
देवसंस्थानच्या कारभाराविरुद्ध जेजुरीत उत्स्फूर्त बंद
By admin | Updated: May 7, 2016 01:52 IST