चितळे समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:34 AM2018-07-21T05:34:49+5:302018-07-21T05:35:45+5:30

मुंबईमध्ये दरवर्षी सरासरी २ हजार ४०० मिमी इतक्या पावसाची नोंद होते. पावसाळ्यात ताशी ५० मिमीपर्यंत पाऊस पडल्यास निचरा होण्याकरिता पर्जन्य जलवाहिन्या सक्षम आहेत.

Immediately implement the recommendations of the Chitale Committee | चितळे समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी

चितळे समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी

Next

नागपूर : मुंबईमध्ये दरवर्षी सरासरी २ हजार ४०० मिमी इतक्या पावसाची नोंद होते. पावसाळ्यात ताशी ५० मिमीपर्यंत पाऊस पडल्यास निचरा होण्याकरिता पर्जन्य जलवाहिन्या सक्षम आहेत. तथापि, २६ जुलैनंतर नेमलेल्या चितळे समितीने केलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुंबई महानगरपालिकेस देण्यात येतील, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी बोलताना सांगितले.
सदस्य अ‍ॅड. पराग अळवणी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले, मुंबईत पावसामुळे साचलेल्या पाण्याचा जलद गतीने निचरा करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ३०० पर्जन्य जल उदंचन संच तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे मार्गावरील पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी सायन व माटुंगा येथे ताशी १००० घनमीटर क्षमतेच्या दोन उदंचन संचांची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावर्षी झालेल्या नालेसफाईमुळे व नाले रुंदीकरणाच्या कामामुळे नाल्यांमधून वाहून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच लव्हग्रोव्ह व इर्ला उदंचन केंद्रामध्ये प्रथमच वापरण्यात आलेल्या ट्रॅश ब्रुममुळे मोठ्या प्रमाणात वाहून येणारा कचरा अडविला जातो आहे. तसेच ब्रिम्सस्टोवॅड प्रकल्पांतर्गत गेल्या आठ वर्षात हाजिअली, इर्ला, लवग्रुव्ह, क्लीवलँड व बिटानिया अशी एकूण ५ पर्जन्य उदंचन केंद्रे कार्यान्वित झालेली असून ते पूर्ण क्षमतेने चालू आहेत. या ५ पर्जन्य उदंचन केंद्रांमधून २०१८ च्या पावसाळ्यात १८ जुलैपर्यंत ३३ हजार ५७१ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करून पाणी समुद्रात सोडण्यात आलेले आहे. मनपास टास्क फोर्स तसेच समयबद्ध कार्यक्रम राबविण्याबाबतही सूचना देण्यात येतील, असेही डॉ. पाटील यांनी उपस्थित उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
सदस्य आशिष शेलार, योगेश सागर, कालिदास कोळंबकर यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

Web Title: Immediately implement the recommendations of the Chitale Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.