मुंबई : देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील घोटाळा करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी महाड (जि.रायगड) येथील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात आमदार गोगावणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाबाई मंदिरातील देवीच्या चांदीच्या रथामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. देवस्थानातील अनेक घोटाळ्याबाबत मागील वर्षी विधशनसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या भावना लक्षात घेऊन घोटाळ्याबाबत सीआयडी चौकशीचे आदेश देऊन विशेष तपास पथक नेमले होते.देवीच्या रथात चांदीचा घोटाळा करणाऱ्या कारागीर संजय साडविलकर आणि देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या विषयात जातीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा दडपण्याचा प्रकार सुरु आहे. चांदीच्या रथाबाबत पूर्ण प्रक्रीया अयोग्य आणि नियमबाह्य पध्दतीने राबविण्यात आली. रथासाठी शासनाची परवानगी घेण्यात आली नाही. चांदीच्या खरेदीच्या निविदेसाठी मान्यता घेण्यात आली नाही.प्रत्यक्षात किती किलो चांदी वापरली याचा हिशेब नाही. शुद्धतेचे प्रमाणपत्र नाही, किती गेजचा पत्रा वापरला याची माहिती नाही, असे असताना गुन्हेगारांना पाठीशी घातले जात असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
अंबाबाई मंदिर घोटाळाप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करा
By admin | Updated: August 5, 2016 01:37 IST