Pratap Sarnaik News: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या रिक्षा परवाने व बॅच वितरण प्रक्रियेत होत असलेल्या कथित अनियमितता आणि बोगस कागदपत्रांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. यानुसार, मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे कठोर निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यातील सर्व परिवहन अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, परवाने देण्याची प्रक्रिया ऑनलाइन असली तरी बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने दिल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार, मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत काही परदेशी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने रहिवासी दाखले मिळवून रिक्षा व टॅक्सी परवाने प्राप्त केल्याचे आरोप आहेत. विशेषतः शहरातील डाचकुलपाडा, मांडवीपाडा येथील रहिवासी असल्याचे पुरावे सादर करताना विजेचे बिल हे आदानी कंपनीचे दिले आहे. परंतु या ठिकाणी टाटा पॉवरची वीज पुरवले जाते हे देखील त्यांनी अधोरेखित केले आहे. हि बाब अत्यंत गंभीर असून प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
परवाना धारकास मराठी भाषा येणे अनिवार्य
मीरा-भाईंदर परिसरात विशेष मोहीम राबवून मागील १० वर्षांत दिलेल्या सर्व रिक्षा परवान्यांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी महिनाभराचा विशेष कॅम्प आयोजित करून प्रत्येक कागदपत्राची बारकाईने छाननी करण्यात येईल. मोटार परिवहन विभागाच्या नियमांनुसार संबंधित परवाना धारकास मराठी भाषा येणे अनिवार्य आहे. प्रामुख्याने याची तपासणी करण्यात येणार आहे. अर्थात , चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी आवश्यकतेनुसार मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी तैनात करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, सबब, बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने मिळाल्यास शहराच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे नमूद करत मंत्री सरनाईक यांनी या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याचे आणि कोणतीही ढिलाई न करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना मागील काही वर्षांत दिलेल्या परवान्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले असून, या मोहिमेची सुरुवात मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातून करण्यात येणार असल्याचे सांगितले.
Web Summary : Minister Sarnaik ordered re-verification of rickshaw permits in Mira-Bhayandar due to irregularities. Marathi language proficiency is now mandatory for permit holders. Bogus documents will lead to strict action.
Web Summary : मंत्री सरनाईक ने अनियमितताओं के कारण मीरा-भायंदर में रिक्शा परमिटों के पुन: सत्यापन का आदेश दिया। परमिट धारकों के लिए मराठी भाषा का ज्ञान अनिवार्य है। जाली दस्तावेजों पर सख्त कार्रवाई होगी।