राहुल वाडेकर,
विक्रमगड- पालघर जिल्हा पोलिस कर्मचारी आस्थापना मंडळाची बैठक २९ मे २०१६ रोजी झाली़ त्यामध्ये जिल्हयांतील पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ व या कर्मचाऱ्यांना जुन्या ठिकाणाहुन ३१ मे २०१६ ला कार्यमुक्ती देऊन नवीन बदली झालेल्या ठिकाणी (पोलिस कार्यालयात) १ जून रोजी हजर होणे गरजेचे असतांनाही आज जून संपत आलेला असतांनाही बदली झालेले काही पोलिस जुन्याच ठिकाणी आहेत. कारण त्यांना अद्याप कार्यमुक्ती दिली गेलेली नाही़ त्यामुळे या पोलिसांचे हाल होत आहेत. जून महिना म्हणजे मुलांची शाळा सुरु होते व त्यांना शाळेमध्ये प्रवेश घेणे गरजेचे असते़ नाहीतर पूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता असते़ परंतु या पोलिसांना अजून जुन्या कार्यालयातून सोडले नसल्याने त्यांच्या मुलांचे प्रवेश रखडलेले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे़ तसेच कौटुंबिक अडचणी, नवे निवासस्थान मिळविणे अशा अनेकविध समस्या त्यांच्या समोर निर्माण झाल्न्या आहेत़ त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी सूर उमटत आहे़ त्यामुळे या अडचणी लवकरात लवकर दुर व्हाव्यात अशी त्यांची मागणी आहे़ गृह खात्याने सुध्दा पोलिसांच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या हेळसांडीकडे लक्ष द्यावे.>रिप्लेसमेंट येत नाही तोवर...विक्रमगड पोलिस कार्यक्षेत्रातील २० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असून त्यातील काही पोलिसांना कार्यमुक्त केले गेले आहे़ मात्र अद्याप बऱ्याच पोलिसांना ती मिळालेली नाही. यातील काही कर्मचाऱ्यांना विक्रमगड पोलिस कार्यालयात काम करुन आठ-आठ, नऊ-नऊ वर्षे झाली आहेत़ त्यांना तत्काळ कार्यमुक्त करणे गरजेचे आहे़रिप्लेसमेंट येत नाही तोपर्यत बदलीच्या ठिकाणी सोडले जात नाही असे या कर्मचाऱ्यांना सांगीतले जाते़ परंतु एका ठिकाणाहून प्रथम सोडल्यास दुसऱ्या बाजुकडील कर्मचारी येतच नाही त्यामुळे पहले आप पहले आप असे सुरू आहे.