मुंबई सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान सरकारी अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याने आता सरकारने एक परिपत्रक काढून सरन्यायाधीश महाराष्ट्रात आले तर कोणते राजशिष्टाचार पाळावेत या संबंधीचा आदेश जारी केला आहे. सरन्यायाधीश हे आता कायमस्वरूपी राज्य अतिथी असतील. त्यांच्या मुंबई दौऱ्यात मुख्य सचिव किंवा
त्यांचे प्रतिनिधी, पोलिस महासंचालक अथवा त्यांचे प्रतिनिधी हे मुंबईत, तर राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. कोणीही अतिविशिष्ट व्यक्ती येणार असतील तर त्यांच्या विभागाशी संबंधित संपर्कासाठी समन्वय अधिकारी नेमणे आधीच्या आदेशानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या भेटीवेळी विधि व न्याय विभागाने मुंबईसाठी, तर जिल्ह्यात दौरा असल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वयासाठी वर्ग एकचे अधिकारी नेमणे बंधनकारक असेल. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल
विदर्भात होणार सत्कारमहाराष्ट्राचा अभिमान असलेले देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हृद्य सत्कार करण्यासाठी येत्या जून महिन्यात विदर्भामध्ये तीन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यापैकी नागपुरात दोन, तर अमरावतीत एक कार्यक्रम होणार आहे.पहिला कार्यक्रम २५ जून रोजी अमरावती येथे होणार आहे. हा कार्यक्रम अमरावती जिल्हा वकील संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर नागपूर येथे २७ जून रोजी नागपूर जिल्हा वकील संघटना, तर २८ जून रोजी उच्च न्यायालय वकील संघटनेच्या वतीने सत्काराचा हृद्य सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.