परळीः गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडेंनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. पंकजा मुंडेंनी मंचावरून थेट नाव न घेता भाजपा नेतृत्वालाच इशारा दिला आहे. 26 जानेवारीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक वज्रमूठ तयार करणार असल्याचा निर्धारही त्यांनी केला आहे.मी एक मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार असून, सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बनवू नका, असंही त्यांनी सांगितलं आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा आणि चांगला सधन शेतकरी तयार करण्यासाठी योगदान द्या, असं आवाहनच त्यांनी केलं आहे. 27 जानेवारीला औरंगाबादला मी लाक्षणिक उपोषण करणार असून, मराठवाड्याच्या पाण्याच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधणार असल्याचंही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवलं आहे. पाच वर्षांत जे केलं त्याला पुढे नेण्यासाठी या सरकारचं योगदान महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.
पंकजा मुंडेंची 'वज्रमूठ'; 26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, 27ला लाक्षणिक उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 15:37 IST