लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ओळी मला खूप प्रिय आहेत. एखाद्याने जीव लावला, विश्वास टाकला तर त्याला कमरेची लंगोटीसुद्धा सोडून द्यायची आणि दगाफटका केला तर त्याला योग्य मार्गाने वठणीवर आणायचे हीच त्यांची शिकवण मी आयुष्यभर जपली, असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत काढले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत अभिनंदनाचा ठराव मांडला. तो एकमताने संमतही करण्यात आला. त्याला उपमुख्यमंत्री शिंदे उत्तर देत होते.
शिंदे म्हणाले, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. मला व माझ्या कामाला कायम आशीर्वाद देणाऱ्या वारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा तसेच माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आहे असे मी मानतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे आणि महाराष्ट्राच्या सेवेचे व्रत मला दिले. धर्मवीर आनंद दिघे यांनी जनसेवेचे संस्कार दिले. तुकोबांच्या नावाचा पुरस्कार हा याच संस्कारांचा सन्मान आहे.