जळगाव : राजकारणात बऱ्याच वेळेस कठोर निर्णय घ्यावे लागतात. युती तोडण्याबाबत निर्णय कळविण्याची वेळ आली, त्या वेळी मीच पुढाकार घेऊन शिवसेनेला निरोप कळविला. त्या वेळी अन्य मंडळी मागे सरकली होती, असा गौप्यस्फोट महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे आयोजित सत्कार समारंभात केला.जळगाव पीपल्स बँकेतर्फे खडसे कुटुंबीयांचा रविवारी सत्कार झाला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, राज्यात स्वबळावर सत्ता येऊ शकते काय, असा प्रश्न त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. तेव्हा आपण त्यास स्पष्ट होकार दिला. त्यानंतर मग युती तोडण्याबाबत निर्णय कोण कळविणार, असा प्रश्न निर्माण झाला. त्या वेळी बरीच मंडळी मागे सरकली. राजकारणात काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, ही जाण असल्याने आपण पुढे आलो व शिवसेनेला तसा निरोप कळविला. युती तुटल्यामुळेच जिल्ह्यात राष्ट्रवादीतून भाजपात आलेले व राज्यमंत्री झालेले संजय सावकारे व जळगावचे सुरेश भोळे आमदार होऊ शकले. युती असती तर या जागा शिवसेनेकडे गेल्या असत्या. ही मंडळी आमदार होऊ शकली नसती, असे खडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
युती तोडल्याचा निर्णय मीच कळविला
By admin | Updated: September 7, 2015 01:14 IST