होऊ दे चर्चा...(स्थळ : निवडणूक कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या मस्तपैकी गप्पा रंगलेल्या.)पहिला : (गंभीरपणे) गेल्या चार दिवसांपासून माझ्या कानाला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आजूबाजूला थोडं जरी खुट्ट झालं तरी, कानाचे पडदे फाटल्यासारखं वाटतं.दुसरा : (लगेच सल्ला देत) आजच चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्या. नाहीतर, प्रचार सुरू झाल्यावर ‘कान दाबून कर्ण्याचा मार’ सहन करायला नको.पहिला : (घाबरून) होय. होय. साधी टाचणी जरी फरशीवर पडली तरी, त्याचा आवाज जाणवतो मला.तिसरी : (समजावणीच्या सुरात) हा आपल्या आॅफिसमधला ‘पिनड्रॉप सायलेन्स’चा परिणाम. त्याची कशाला एवढी चिंता करता?चौथा : मला पण गेल्या चार दिवसांपासून गुडघ्याचा त्रास होतोय. पाय थोडं जरी वाकवले तरी, गुडघे दुखतात.पाचवी : (तिसरीच्या कानात कुजबुजत) दिवसभर टेबलावर पाय टाकून बसलं की, असंच होणार ना. इथं कुणी बघायला येत नाही, म्हणून माणसानं एवढंही बिनधास्त वागू नये बाईऽऽ.पहिला : पण काय हो...परवादिवशी तुम्ही आणलेली नवी कादंबरी वाचून संपली का?दुसरा : (गोंधळून) नेमकी कोणती कादंबरी म्हणता ? कारण गेल्या चार-पाच दिवसांत मी सहा पुस्तकं संपवलीत एका बैठकीत. तिसरी : (पाचवीला कोपऱ्यानं ढोसत) तू म्हणे ‘कॅन्डी सागा’ची शंभरावी स्टेप ओलांडलीस काल.पाचवी : (मोबाईलशी चाळा करत) होय गं. गेल्या चार दिवसांत माझा चांगलाच हात बसलाय बघ या ‘गेम’मध्ये. इथं कुणाचाच ‘डिस्टर्ब’ होत नसल्यानं छाऽऽन ‘कॉन्सन्ट्रेशन’ झालंय नां.चौथा : (हाताची टाळी वाजवून नंतर बोटं मोजत) व्वॉऽऽव. एकशे पंचवीस ! कालचा माझाच विक्रम आज मीच मोडला बुवा.सहावा : (गाढ झोपेतून दचकून जागं होत) काय मोडलं? संध्याकाळ झाली का?...चला जाऊ घरी.चौथा : (परत टाळी वाजवून बोटाच्या चिमटीकडं लक्ष वेधत) ही बघा एकशे सव्वीसावी माशी. कमाऽऽल आहे नां, गेल्या चार दिवसांत मी केलेल्या विक्रमाची.(एवढ्यात दोन उमेदवार ‘फॉर्मची भेंडोळी’ घेऊन आत येतात. प्राणीसंग्रहालयातल्या एखाद्या दुर्मिळ प्राण्याकडं पाहवं, तसं पाहत दोघांभोवती कर्मचारी जमतात.) पहिला : (थोडंसं दूर जाऊन बॉसला फोन लावत) साहेऽऽब चमत्कार झाला. आज चक्क अर्ज भरायला दोघेजण आपल्याकडं आलेत. चॅनलवाल्यांना बोलवू का?दुसरा : (पहिल्याच्या कानाला लागत) एवढं उतावळं होऊ नका. अर्ज भरायची भीती दाखवून नंतर ‘सेटलमेंट’ करणारे नेहमीचे महाभाग आहेत, हे दोघं. यांची मनधरणी करायला मागून तिघं-चौघं आलेच बघा. तेव्हा आजचाही दिवस आपला फुक्कऽऽटच जाणार. चला, आपापल्या गप्पांना पुन्हा सुरुवात करू या.- सचिन जवळकोटे
इंतेहाऽऽ हो गयी इंतजारकी...
By admin | Updated: September 24, 2014 11:35 IST