कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने विडंबन गीताद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टिप्पणी केली होती. यावरून दोन्ही शिवसेनेत धुमश्चक्री सुरु असून संतापलेल्या शिंदे समर्थकांनी कुणाल कामराचा स्टँडअप चालणारा स्टुडिओ फोडला आहे. तसेच दिसेल तिथे प्रसाद देण्याचा इशाराही दिला आहे. अशातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील कामराचे हे कृत्य खपवून घेतले जाणार नसल्याचे म्हटले आहे. या दिवसभराच्या घडामोडींवर कामराची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर कामराने एक गाणे म्हटले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून कामरा राजकारण्यांच्या हिटलिस्टवर आला आहे. यात ठाकरे गट कामराची बाजू घेत आहे तर शिंदे गट कुठे कुठे शोधू तुला, अशा अविर्भावात आहे.
दिल तो पागल है या चित्रपटातील आँखो मे मस्ती... या गाण्याच्या चालीवर ठाणे की रिक्षा.... असे विडंबनगीत कुणाल कामराने सादर केले. यात शिवसेनेतील फुटीपासून गुवाहाटी दौरा व नंतरची सत्ताप्राप्ती असे सगळे वर्णन गाण्याच्या चालीवर पद्यात्मक शब्दांमध्ये चपखलपणे बसवले आहे. त्यात कोणाचेही नाव नाही, मात्र घडलेला घटनाक्रम सगळा व्यवस्थितपणे दिला आहे. हे शिंदे गटाला चांगलेच झोंबले आहे.
यावर कामराने स्पष्ट शब्दांत ''मला ते बोलल्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. जर न्यायालयाने मला विचारले तर मी माफी मागेन.'', असे म्हटले आहे. कामराने ही प्रतिक्रिया माध्यमांना किंवा सोशल मीडियावर नाही तर पोलिसांना तक्रारीवर दिलेल्या उत्तरात दिली आहे. एनडीटीव्हीने पोलिस सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी कुणाल कामरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.