यदु जोशीमुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पैशांची प्रचंड उधळपट्टी केली जाते, ही बाब आता लपून राहिलेली नाही. मात्र, त्याचवेळी या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेली खर्चाची मर्यादा बघितली तर इतक्या कमी पैशांमध्ये निवडणूक लढणार कशी? हा प्रश्नच पडतो.
महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठीची निवडणूक खर्च मर्यादा ही १ जानेवारी २०१७ रोजी निश्चित करण्यात आली होती. ती ९ वर्षांनंतरही तशीच कायम आहे. नगर परिषदा आणि थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ही ऑक्टोबर २०१६ मध्ये निश्चित करण्यात आली होती. ती अजूनही तशीच आहे. खर्चाची ही मर्यादा वाढवावी, अशी मागणी आता होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला तीन-तीन कोटी रुपये खर्च येतो अन् कधीकधी १०० बोकड कापावे लागतात, असे विधान शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अलीकडेच केले होते. राजकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात, की जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत एकेक दोन-दोन कोटी रुपये खर्च करावे लागतात. घरामागे पैसे मोजावे लागतात. कार्यकर्त्यांच्या जेवणावळी, पेट्रोल-पाणी वेगळे.
महापालिकेसाठी काय आहे खर्चाची मर्यादा?
श्रेणी / सदस्यसंख्या | खर्चाची मर्यादा |
---|---|
मुंबई महापालिका | १० लाख रु. |
१६१ ते १७५ सदस्यसंख्या | १० लाख रु. |
१५१ ते १६० सदस्यसंख्या | १० लाख रु. |
११६ ते १५० सदस्यसंख्या | ८ लाख रु. |
८६ ते ११५ सदस्यसंख्या | ७ लाख रु. |
६५ ते ८५ सदस्यसंख्या | ५ लाख रु. |
नगर परिषदांमध्ये खर्च मर्यादा
वर्ग / नगरपंचायत | खर्चाची मर्यादा |
---|---|
अ वर्ग | ३ लाख रु. |
ब वर्ग | २ लाख रु. |
क वर्ग | १.५० लाख रु. |
नगर पंचायत | १.५० लाख रु. |
थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा
वर्ग | खर्चाची मर्यादा |
---|---|
अ वर्ग | १० लाख रु. |
ब वर्ग | ७.५० लाख रु. |
क वर्ग | ५ लाख रु. |
जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांचा खर्च
गटसंख्या (जिल्हा) | जिल्हा परिषद खर्चाची मर्यादा | पंचायत समिती खर्चाची मर्यादा |
---|---|---|
७१ ते ७५ गट | ६ लाख रु. | ४ लाख रु. |
६१ ते ७० गट | ५ लाख रु. | ३.५० लाख रु. |
५० ते ६० गट | ४ लाख रु. | ३ लाख रु. |
निवडणुकीसाठी वाढलेला खर्च, महागाईचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने यावेळच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा तातडीने वाढविणे आवश्यक आहे. सध्याच्या मर्यादेत आज निवडणूक लढणे अशक्य आहे. - राजकिशोर (पापा) मोदी, माजी अध्यक्ष, नगराध्यक्ष संघटना.