ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १५ - देशाच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणाचे बलिदान देणा-या जवानांच्या कुटुंबियांना चांगले आयुष्य मिळालेच पाहिजे. तशी ती आपली जबाबदारी आहे. पण अनेकदा प्रशासनाच्या अनास्थेमुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या नशिबी परवड येते. आज देशाच्या स्वातंत्र्यदिनी अशाच एका शहीद जवानाच्या विधवा पत्नीची मनाला चटका लावणारी कहाणी समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावी रहाणारे विश्वंभर जाधव १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झाले. विश्वंभर जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी यमुनाबाई जाधव यांच्या आयुष्याच्या संघर्षमय प्रवासाला सुरुवात झाली. लग्नाला अवघे दोन महिने झालेले असताना विश्वभंर भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झाले.
यमुनाबाई अशिक्षित असल्याने त्यांना मदत करणा-यांपेक्षा लुटणारेच जास्त भेटले. त्यामुळे शहीद सैनिकाच्या पत्नीला जे लाभ मिळतात ते त्यांना मिळाले नाहीत. सासरकडच्या लोकांनी घरातून बाहेर काढले. पण यमुनाबाईंना भावाने आणि आईने मदतीचा हात दिला.
यमुनाबाईंकडे आज स्वत:चे घर नाही. १९७१ च्या बेसिक आधारावर मिळणारी पेन्शन तुटपुंजी आहे. त्यामुळे वयाच्या ५५ व्या वर्षी दुस-याच्या शेतात मोलमजुरी करुन दिवस ढकलावे लागत आहेत. शेतात राबण्याचे दिवसाचे त्यांना १५० रुपये मिळतात. शासकीय कार्यालयात खेटे घालून मदतीसाठी पाठपुरावा केला पण आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरात काही पडले नाही.