मुंबई : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट व अवकाळी पावसाचा मारा सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत सहा जणांचे बळी गेले आहेत. त्यात खान्देशातील चार व नगरमधील दोघांचा समावेश आहे. सलग तीन दिवसांच्या गारांच्या माऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीचा सर्वाधिक तडाखा मराठवाडा व खान्देशला बसला आहे. मराठवाड्यात जालना, बीड, लातूर, परभणी, उस्मानाबादेत रविवारी सलग दुसऱ्या दिवशी गारांचा मारा सुरू होता, त्यामुळे शेतपिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.धुळे जिल्ह्यात मनोज युवराज साने (२२, रा. धोंगडे ता. साक्री) हा युवक अंगावर वीज पडून जागीच ठार झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीररीत्या भाजले. जळगावमध्ये झाड कोसळून मेहमुदा शेख चांद (५०) ही महिला तर बाबुलाल सोनावणे यांचा मृत्यू झाला. रावेर येथे विजेचा खांब अंगावर पडून रामसिंग सुका साबळे (५०) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत पाच जखमी झाले आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये गारपिटीने कांदा व केळीचे नुकसान झाले. मराठवाड्यात वादळी पावसामुळे झाडे, विजेचे खांब रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोलमडली. बीडमध्ये सलग चौथ्या दिवशी गारा बरसल्या. लातूर जिल्ह्यात रविवारी रात्री गारांचा पाऊस झाला. नांदेड, जालना, हिंगोलीत सलग तीन दिवस वादळी पाऊस सुरू असल्याचे शेती उद्ध्वस्त झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गारांचा मारा सुरूच
By admin | Updated: April 13, 2015 06:04 IST