मुंबई - २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व ७ आरोपींची एनआयए कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. कालच संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदू दहशतवादी असू शकत नाही असं विधान केले होते. त्यानंतर आज या घटनेतील आरोपींची निर्दोष मुक्तता होणे हा केवळ योगायोग असू शकतो अशी प्रतिक्रिया माजी खासदार प्रज्ञा ठाकूरचे वकील जे.पी. मिश्र यांनी दिली आहे.
प्रज्ञा ठाकूरचे वकील म्हणाले की, अमित शाहांचे विधान हा योगायोग असला तरीही हिंदू दहशतवादी असू शकत नाही हे सिद्ध झाले आहे असं त्यांनी सांगितले तर आज भगव्याचा विजय झाला आहे. हिंदुत्वाचा विजय झाला आहे. जे दोषी असतील त्यांना देव शिक्षा देईल. मला १३ दिवस छळण्यात आले. माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. १७ वर्ष मला अपमानित व्हायला लागले अशी भावना या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूरने व्यक्त केली आहे.
कोर्टात काय घडले?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज कोर्टात १७ वर्षांनी निकाल सुनावण्यात आला. यावेळी न्या. लाहोटी यांनी स्फोटातील तपासात कमतरता असल्याचे निरीक्षण नोंदवले. संशयाच्या आधारे आरोपींना दोषी ठरवले जाऊ शकत नाही. स्फोटात वापरण्यात आलेली दुचाकी प्रज्ञा ठाकूरच्या नावावर नोंद होती हे सिद्ध करता आले नाही असं कोर्टाने म्हटलं. तपासातल्या त्रुटीवर भाष्य करत कोर्टाने या खटल्यातील सर्व आरोपी ज्यात प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वैदी, सुधाकर द्विवेदी यांना निर्दोष सोडले.
काय म्हणाले होते अमित शाह?
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत अमित शाह यांनी राज्यसभेत काँग्रेसवर निशाणा साधला. काही लोक लष्कर ए तय्यबाच्या या दहशतवादी हल्ल्याबाबत हिंदुत्ववादी संघटनांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा यात समावेश आहे. काँग्रेसने मतांसाठी दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला परंतु भारतातील जनतेने त्यांचे खोटे स्वीकारले नाही. काँग्रेसने कायम तुष्टीकरणाचं राजकारण केले. या देशात दहशतवाद पसरण्याचं एकमेव कारण म्हणजे काँग्रेसची व्होट बँक पोलिटिक्स आहे. त्यामुळे भारताची अंतर्गत सुरक्षा कमकुवत करण्याचं काम त्यांनी केले. मी गर्वाने सांगू शकतो, हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही असं शाह यांनी म्हटले होते.