मुंबई : महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी आदराने, सौजन्याने वागा, असे आदेश पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच पोलीस महिलांच्या तक्रारींचा निपटारा करण्याची जबाबदारी त्यांनी उपायुक्त शारदा राऊत आणि सुप्रिया पाटील-यादव यांच्यावर सोपवली आहे.हे आदेश प्रामुख्याने पोलीस ठाण्याला व्हिजीट देणाऱ्या उपायुक्त आणि साहाय्यक उपायुक्तांसाठी असल्याचे समजते. काही पोलीस महिलांच्या तक्रारी पोहोचल्यानंतर मारिया यांनी हे आदेश दिल्याची चर्चा आहे. उपायुक्त राऊत, पाटील-यादव यांनी शहरातील तमाम पोलीस ठाण्यांतल्या पोलीस महिलांच्या बैठका घ्याव्यात, त्यांच्याशी चर्चा करावी. या चर्चेतून त्यांच्या समस्या, तक्रारी आणि मागण्या जाणून घ्याव्यात व योग्य ती कारवाई करावी, अशा मारिया यांच्या सूचना आहेत. पोलीस ठाण्यात महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, स्वच्छतागृह असावे, कपडे बदलण्यासाठी किंवा विश्रामासाठी स्वतंत्र कक्ष असावा, वरिष्ठ आणि पुरुष सहकाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळावी या महिला पोलिसांच्या प्रमुख मागण्या आहेत.
महिला कर्मचाऱ्यांशी आदराने, सौजन्याने वागा
By admin | Updated: September 11, 2014 03:32 IST