प्रा. नानासाहेब कांडलकर जळगाव जामोद (जि. बुलडाणा): येत्या खरीप हंगामासाठी शेतमालाच्या खरेदीसंदर्भातील धोरण हंगामापूर्वीच जाहीर केले जाईल. त्यामुळे शासनाकडून खरेदी केल्या जाणार असलेल्या शेतमालाची माहिती शेतकर्यांना आधीच मिळेल. परिनामी शेतकर्यांना शेतमालाचे योग्य नियोजन करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. प्रतापराव जाधव, आ.डॉ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, आ.डॉ. संजय रायमुलकर, आ. राहुल बोंद्रे, आ. शशिकांत खेडेकर, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते.शासनाने आतापर्यंंतची सर्वात मोठी शेतमाल खरेदी तुरीच्या स्वरूपात केली आहे. यावर्षी विक्रमी तूर खरेदी करून शेतकर्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शासकीय खरेदी केंद्रावर २२ एप्रिलपर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या तुरीची संपूर्ण खरेदी शासन करणार आहे. येत्या आठवड्यात ही तूर खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वजनकाटे व मनुष्यबळ वाढवावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. शेतकर्यांना कृषी कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणार्या राष्ट्रीयीकृत बँकांविरुद्ध जिल्हाधिकार्यांनी फौजदारी कारवाई करावी, असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला. बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्न उपस्थित केले; त्याचे मुख्यमंत्र्यांनी त्वरित निराकरण केले. बैठकीत सादरीकरण जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले, तर प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले. या बैठकीला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जीगाव प्रकल्पाचा मुख्यमंत्री वार रूममध्ये समावेश- घाटाखालील सहा तालुक्यांसाठी जिगाव प्रकल्प हा त्वरित पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी या प्रकल्पाचा समावेश मुख्यमंत्री वार रूममध्ये केला असून, या प्रकल्पासाठी निधी कमी पडणार नाही. नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊन, सहा तालुक्यांतील सुमारे ८४ हजार हेक्टर शेतजमीन ही ओलिताखाली येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गटशेतीवर भर! -खारपाणपट्टय़ातील शेतीचा विकास करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आढावा सभेत दिली. या पट्टय़ातील व अन्य भागासाठी गट शेतीचा पर्यायसुद्धा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. किमान २0 शेतकर्यांनी एकत्र येऊन किंवा १00 एकरांचा गट बनवून गट शेती करावी, अशा शेतीला शासनाच्या कृषी विकासाच्या सर्व योजनांचा एकत्रित लाभ देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ११५ जणांवर स्थानबद्धतेची कारवाई-अनुचित प्रकार करू नये म्हणून ११५ जणांवर पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली. यामध्ये ९९ पुरुष व १६ महिलांचा समावेश होता. शेतकरी संघटना व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा प्रामुख्याने स्थानबद्ध करण्यात आलेल्यांमध्ये समावेश होता.
हंगामापूर्वीच शेतमालाच्या खरेदीचे धोरण ठरविणार - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 02:34 IST