ऑनलाइन लोकमत
कोची, दि. २ - केरळमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राच्या नेट बॉल खेळाडूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मयुरेश पवार असे त्या दुर्दैवी तरूणाचे नाव असून तो अवघा २१ वर्षांचा होता.
महाराष्ट्र वि चंदीगड सामन्यानंतर मयुरेशच्या छातीत दुखू लागले, त्याच्यावर मैदानातच उपचार करण्यात आले मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. वैद्यकीय मदतीसाठी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले , मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. केरळचे क्रीडामंत्री राधाकृष्ण यांनी या घटनेची माहिती दिली असून मयुरेशला श्रद्धांजलीही वाहिली आहे. काही वेळातच मयुरेशचा मृतदेह महाराष्ट्रात पाठवण्यात येईल असे समजते.