Congress Harshwardhan Sapkal: देशात बेरोजगारीची समस्या सर्वांत मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला विचार देण्याचे काम केले आहे. यापुढे असे रोजगार मेळावे राज्यातील सर्व जिल्ह्यात घेतले जातील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत, केंद्रात २.५ कोटींपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत परंतु भाजपाचे सरकार या रिक्त जागांवर भरती करत नाही. दरवर्षी २ कोटी रोजगार देणार, मेगाभरती करणार या वल्गणा हवेतच विरल्या आहेत. भाजपा सरकार तरुणांच्या हाताला काम न देता शोषणावर आधारीत समाज निर्माण करत आहे. भाजपाच्या राज्यात श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढत आहे. राष्ट्रपुरुष, राष्ट्रसंत असतात तसे भाजपा राजवटीत दोन राष्ट्रीय शेठ असून त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरले जात आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
अनेक उद्योग व गुंतवणूक दुसऱ्या राज्यात गेली
बेरोजगारीचा दर ८ टक्यांपेक्षा जास्त असून ४०-४५ वर्ष वय झाले तरी नोकरी मिळत नाही असे चित्र आहे. महाराष्ट्रातील रोजगार दुसऱ्या राज्यात जात आहेत. पुण्यातील आयटी कंपन्यांही दुसऱ्या राज्यात गेल्या आहेत. भाजपा सरकारच्या काळात राज्यातील अनेक उद्योग व गुंतवणूकही दुसऱ्या राज्यात गेली आहे. जात व धर्माच्या नावाखाली वाद निर्माण करून परिस्थिती गढूळ बनवल्याने राज्यात रोजगार निर्माण कसे होणार, असा प्रश्न विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७५ व्या वाढदिवसानिर्मित काय शुभेच्छा देणार, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, वयाच्या ७५ नंतर वानप्रस्थाश्रमात जावे असे रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुचनेनुसार नरेंद्र मोदी आता राजधर्माचे पालन करणार का? तसेच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची ७५ वर्षाचे कारण देत जशी मार्गदर्शक मंडळात रवानगी केली तसेच मोदीही त्या मंडळात जाण्याचा मार्ग अवलंबणार का? अशी विचारणा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.