चेतन ननावरे, मुंबईराज्यातील सलून ब्युटी पार्लर असोसिएशनने १० ते २० टक्के वार्षिक दरवाढीची घोषणा करीत ग्राहकांना नव्या वर्षाची अनोखी भेट दिली आहे. राज्यातील सर्व सलूनमध्ये १ जानेवारी २०१५पासून नवी दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.संघटनेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक बैठकीत दरवाढीचा निर्णय घेतल्याचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. चव्हाण म्हणाले, राज्यातील प्रत्येक विभागात किमान १० ते २० टक्के दरवाढ होणार आहे. वीज दरवाढ, जागेचे भाडे, पालिकेचे कर आणि कामगारांच्या पगारात झालेल्या वाढीमुळे दरवर्षी संघटनेकडून एकदाच दरवाढ करण्यात येते. नव्या वर्षीचे दरपत्रक लवकरच सर्व सलून आणि ब्युटीपार्लरमध्ये लावण्यात येईल. सध्यातरी विभागानुसार बैठका सुरू असून त्या-त्या विभागातील दर ठरवण्यात येत आहेत.अनेक कारणास्तव ही वाढ करावी लागत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले, ‘केस कटिंग आणि दाढी करताना वापरण्यात येणाऱ्या कैचीपासून कंगवा, फोम, क्रीम, वस्तरा, ब्लेड अशा कैक वस्तूंमध्ये दरवर्षी वाढ होत असते. पालिकेला भरण्यात येणाऱ्या करासह जागेच्या भाड्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे किमान १० टक्के दरवाढ दरवर्षी करावीच लागते.
हजामत महागणार !
By admin | Updated: December 29, 2014 05:46 IST