चंद्रपूर : मूल तालुक्यातील मरेगाव येथील ग्रेटा पॉवर प्लँटमध्ये वीज निर्मितीसाठी दगडी कोळशाएवजी टायरच्या भुकटीचा वापर केला जात आहे. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर राख पसरली असून वातावरण प्रदूषित होत असल्याचा आरोप विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस यांनी केली आहे.नागरिकांकडून तक्रारी आल्याने या ठिकाणची पाहणी केल्यावर फडणवीस यांनी रविवारी सकाळी चंद्रपुरात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.मूल परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पसरत असूनही प्रदूषण नियंत्रण विभाग कसलीही दखल घ्यायला तयार नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्या म्हणाल्या, आपण या परिसरात प्रत्यक्ष भेट दिली असता, प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर टायरच्या भुकटीच्या पोत्यांचा साठा ठेवलेला आढळला. हा साठा कोळशाऐवजी वापरला जात आहे.हा प्रकार कुणाच्याही लक्षात येऊ नये, याची खबरदारी व्यवस्थापन घेत आहे. टायरच्या भुकटीचा वापर केल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पसरले असून डोळे चुरचुरणे, श्वसनाचे विकार वाढले आहेत. परिसरात नेहमी काळा धुर पसरलेला असतो. प्लँटमधून निघणारी राख नहरात सोडली जात असून ते पाणी शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे पाणीही प्रदूषित झाले आहे. दुसरा नहर जिल्हा परिषदेच्या मामा तलावाला जोडला असून दूषित पाणी तलावात पोहोचत आहे. यामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
ग्रेटा पॉवर प्लँटमध्ये कोळशाऐवजी टायरची भुकटी
By admin | Updated: September 28, 2015 02:40 IST